

बुखारेस्ट : रोमानियातील पुरातत्त्वशास्त्रज्ञांना एका रोमन-काळातील जळालेल्या घराच्या अवशेषांमध्ये वितळलेला मौल्यवान खजिना सापडला आहे. संशोधनाचे नेतृत्व करणार्या रोमानियाच्या नॅशनल म्युझियम ऑफ हिस्ट्रीने दिलेल्या निवेदनाच्या भाषांतरानुसार, सुमारे 1,900 वर्षांपूर्वी एका महत्त्वाच्या कुटुंबाचा हा खजिना असावा. संशोधकांना काळ्या समुद्राच्या पश्चिम किनारपट्टीवरील ऐतिहासिक ‘हिस्ट्रिया’ शहराच्या अवशेषांमध्ये 40 हून अधिक नाणी आणि मौल्यवान धातूंनी बनवलेले अनेक दागिने सापडले. हिस्ट्रिया, जी मूळतः प्राचीन ग्रीक वसाहत होती, ती पहिल्या शतकात रोमन साम्राज्याने आपल्या ताब्यात घेतली होती.
संग्रहालयाच्या माहितीनुसार, आगीमुळे धातू वितळून एकत्र चिकटले आणि त्यामुळे ज्या लाकडी पेटीत ते ठेवले होते तिचा आकार कायम राहिला. वैयक्तिक नाण्यांनीही त्यांचा गोलाकार आकार टिकवून ठेवला आहे, जरी शतकानुशतके ते गंजले आहेत. निवेदनात असेही नमूद केले आहे की, त्याच स्तरावर इतरही अनेक वस्तू सापडल्या, ज्यात मातीची भांडी, शिलालेख, आणि कांस्य, लोखंड, काच तसेच दगडांपासून बनवलेल्या वस्तूंचा समावेश आहे. हे घर अतिशय ‘भव्य’ होते, असे निवेदनात म्हटले आहे.
त्यात चुन्याच्या दगडाची फरशी आणि रंगवलेल्या प्लास्टरच्या भिंती होत्या. या तपशिलांवरून असे सूचित होते की हे घर एका उच्चभ्रू कुटुंबाचे होते. पुरातत्त्वशास्त्रज्ञांनी या वस्तूंना दुसर्या किंवा तिसर्या शतकातील रोमन साम्राज्याच्या ‘प्रिंसिपेट’ कालखंडातील मानले आहे. इसवी सनपूर्व 27 मध्ये ऑगस्टस सीझरच्या राजवटीपासून सुरू होऊन इसवी सन 284 मध्ये संपलेल्या या काळात, रोमन समाजरचनेमध्ये एकाच सम्राटाच्या हातात सत्ता केंद्रित करण्यात आली होती, तरीही प्रजासत्ताकाचा बाह्य देखावा कायम ठेवला होता.