

लंडन : कधी कधी अपघातानेही काही शोध लागत असतात. एरवी पुरातत्त्व संशोधक काही विशिष्ट ठिकाणी वैज्ञानिक पद्धतीने उत्खनन करून जुन्या काळातील वस्तू शोधत असतात; पण कधी कधी बांधकाम किंवा तत्सम कारणांसाठी केलेल्या खोदकामातूनही अशा वस्तू मिळतात. आता अशीच एक घटना इंग्लंडमध्ये घडली आहे. तिथे एका महामार्गाची डागडुजी करण्यासाठी खोदकाम सुरू होते. त्याचवेळी खोदकाम करताना एक शवपेटी आढळली. काम थांबवण्यात आले. सरकारने पुरातत्त्व शास्त्रज्ञांना पाचारण केले. त्यांनी शवपेटी उघडली. ही शवपेटी उघडताच जवळपास 1500 वर्षे जुने रहस्य उघडले.
इंग्लंडमधील पीटरबरो जवळील वेन्सफोर्ड आणि सुटॉन या दरम्यान रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले होते. हा एक पदरी रस्ता होता. वाढत्या वाहतुकीमुळे तो दुहेरी करण्याचे ठरवण्यात आले. त्यासाठी खोदकाम सुरू झाले. खोदकाम करताना तिथे एक दगडी शवपेटी मिळाली. ही शवपेटी जवळपास 750 किलोची होती. त्यामुळे यामध्ये काय आहे, याची सर्वांनाच उत्सुकता लागली होती. आजूबाजूच्या शहरातील लोकांनी सुद्धा गर्दी केली. ही शवपेटी जवळपास 1500 वर्षे जुनी आणि रोमन पद्धतीची होती. जो रस्ता दुहेरी पदराचा करण्यात येत होता. त्याला इतिहासाचे संदर्भ होते. हा रस्ता प्राचीन रोमन रस्ता होता. हेडलँड पुरातत्त्व विभागाचे प्रमुख डेव्हिड हॅरिसन यांनी हा प्रमुख शोध असल्याचे म्हटले होते. ए 47 या रस्त्यावर जवळपास 7 महिन्यांपासून काम सुरू होते. त्यासाठी 20 सिव्हिल इंजिनिअर आणि 52 पुरातत्त्व शास्त्रज्ञ काम करत होते. त्यांना पूर्वीपासूनच या रस्त्याच्या खाली काही तरी अद्भुत मिळेल, असे अंदाज होता. हा रस्ता ब्रिटन आणि रोमन साम्राज्याला जोडणारा एक प्राचीन रस्ता होता. डेव्हिड हॅरिसन यांच्या टीमने ही शवपेटी उघडली. तेव्हा त्यात अनेक ऐतिहासिक वस्तू मिळाल्या. त्यात एक मानवी सापळा मिळाला. रोमन लोक कसे असतील, हे त्यावरून लक्षात येत होते. ही व्यक्ती श्रीमंत असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्याच्या अंगावर श्रीमंतीचे प्रतीक असलेले जिप्सम मिळाले. या शवपेटीवरील कलाकुसरसुद्धा अप्रतिम होती. या वस्तूचे आणि मानवी सापळ्याचे आता बारकाईने निरीक्षण करण्यात येत आहे. त्याआधारे इतिहासाचे काही धागे उलगडण्यात मदत होणार आहे.