Curiosity rover | मंगळावर क्युरिऑसिटी रोव्हरच्या भुजेत अडकला दगड!

Curiosity rover |
Curiosity rover | मंगळावर क्युरिऑसिटी रोव्हरच्या भुजेत अडकला दगड!
Published on
Updated on

वॉशिंग्टन : अमेरिकन अंतराळ संस्था ‘नासा’च्या क्युरिऑसिटी रोव्हरने मंगळ ग्रहावर एक मोठे संकट यशस्वीरित्या परतवून लावले आहे. रोव्हरच्या रोबोटिक हाताला गेल्या आठवडाभरापासून एक दगड अडकला होता, ज्यामुळे शास्त्रज्ञांची चिंता वाढली होती. अखेर हा दगड काढून टाकण्यात यश आले असून शास्त्रज्ञांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.

मंगळावरील ‘गेल क्रेटर’ जवळील माऊंट शार्पच्या उतारावर शोधकार्य सुरू असताना ही घटना घडली. क्युरिऑसिटीला तिथे एक साधारण दिसणारा दगड आढळला, ज्याला शास्त्रज्ञांनी ‘अटाकामा’ असे नाव दिले होते. या दगडाचा व्यास सुमारे 1.5 फूट आणि वजन अंदाजे 13 किलोग्रॅम होते. 25 एप्रिल रोजी, जेव्हा रोव्हरने या दगडाचा नमुना घेण्यासाठी त्यात ड्रिलिंग (छिद्र पाडण्याचा) प्रयत्न केला, तेव्हा एक विचित्र तांत्रिक अडचण निर्माण झाली. नासाने दिलेल्या निवेदनानुसार, रोव्हरने जेव्हा ड्रिलिंग करून आपला हात मागे घेतला, तेव्हा तो दगड जमिनीवर न राहता थेट ड्रिलच्या बाह्य भागाला चिकटून वर आला.

ड्रिलिंग करताना दगड फुटल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत; परंतु पूर्ण दगड ड्रिलला अडकून राहण्याची ही पहिलीच वेळ होती. यामुळे रोव्हरचा रोबोटिक हात निकामी होण्याची भीती निर्माण झाली होती. हा अडकलेला दगड काढण्यासाठी नासाच्या शास्त्रज्ञांनी विशेष योजना आखली. प्रसिद्ध करण्यात आलेल्या व्हिडीओ फुटेजमध्ये, क्युरिऑसिटी रोव्हर आपला धातूचा हात वेगवेगळ्या कोनात झुकवून, फिरवून आणि थरथरवून तो ‘जिद्दी’ प्रवासी म्हणजेच दगड झटकण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.

स्पेस सायन्स इन्स्टिट्यूटचे वरिष्ठ शास्त्रज्ञ बिल फॅरँड यांनी सांगितले की, ‘दगडापासून ड्रिल बिट मोकळे करणे हे एक मोठे आव्हान होते आणि यासाठी रोव्हरला बराच संघर्ष करावा लागला. अखेर या प्रयत्नांना यश आले असून, क्युरिऑसिटी रोव्हर आता पुन्हा एकदा मंगळावरील आपल्या मोहिमेसाठी सज्ज झाला आहे. या रोव्हरमधील ‘ओनबोर्ड वेट केमिस्ट्री लॅबोरेटरी’द्वारे आता या भागातील माती आणि खडकांचे अधिक विश्लेषण केले जाणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news