

बीजिंग : कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात ‘एआय’ च्या क्षेत्रात गेल्या काही वर्षांत अत्यंत वेगाने बदल झाले आहेत. ChatGPT आणि Gemini सारख्या प्रगत एआय मॉडेलच्या आगमनाने तंत्रज्ञान जगतात मोठे बदल घडवून आणले आहेत. याच पार्श्वभूमीवर भारताचा शेजारी देश चीनही एका मोठ्या क्रांतीच्या तयारीत आहे. प्रसारमाध्यमांतील वृत्तांनुसार, चीनमधील रोबोटिक्स क्षेत्रातील एका स्टार्टअप कंपनीची मोठी योजना समोर आली आहे, ज्याला रोबोटिक्स उद्योगातील ‘ChatGPT मोमेंट’ म्हटले जात आहे. सध्या तयार केल्या जाणाऱ्या रोबोंमध्ये कामाचा एक निश्चित साचा (फिक्स पॅटर्न) पाहायला मिळतो; परंतु चीनची ही कंपनी आता हा पॅटर्न बदलण्याच्या तयारीत आहे. ‘स्पिरिट एआय’ (Spirit AI) असे या कंपनीचे नाव आहे. स्पिरिट एआयचे सह-संस्थापक आणि मुख्य शास्त्रज्ञ गाओ यांग यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, २०२७ पर्यंत मानवाकृती रोबो माणसांच्या दैनंदिन भाषेतील सूचना समजून काम करण्यात पारंगत होतील. म्हणजेच, माणसांशी बोलून जसे काम करून घेतले जाते. तसेच, काम या रोबोंकडूनही करून घेता येईल.
रोबोटिक्सचे जगही स्वतःच्या ‘ChatGPT मोमेंट’ची आतुरतेने वाट पाहत असल्याचे या चिनी कंपनीचे म्हणणे आहे. २०२२ मध्ये ChatGPT आल्यानंतर लोकांसाठी जनरेटिव्ह एआयचा वापर अत्यंत सोपा आणि उपयुक्त ठरला. त्याच धर्तीवर आता रोबोटिक्स क्षेत्रातही असे सॉफ्टवेअर तयार करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, जे रोबोला एकाच साच्यातील कामापुरते मर्यादित न ठेवता विविध प्रकारच्या कामांमध्ये तज्ज्ञ बनवेल. गाओ यांग म्हणाले की, २०२७ च्या पहिल्या सहा महिन्यांत रोबो GPT-3.0 च्या स्तरापर्यंत पोहोचू शकेल, असा कंपनीला पूर्ण विश्वास आहे. या स्थितीत माणूस रोबोंशी आपल्या रोजच्या भाषेत संवाद साधू शकेल. माणसाची रोजची बोलचाल रोबो सहज समजून घेईल आणि त्यानुसार विविध शारीरिक कृती करण्याचा प्रयत्न करेल. मात्र, पुढील वर्षापासून रोबो घरातील सर्व कामे आपोआप हाताळू लागतील असा याचा अर्थ नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. कारखाने किंवा नियंत्रित वातावरणाच्या तुलनेत घरात काम करणे अधिक वेगळे आणि कठीण असते, असे कंपनीने स्पष्ट केले.
कशी होत आहे रोबोंची तयारी?
‘स्पिरिट एआय’ कंपनी आपल्या रोबोना प्रशिक्षण देण्यासाठी प्रत्यक्ष जगातून माहिती गोळा करत आहे. यासाठी सुमारे १,००० कंत्राटी कर्मचारी घरे आणि कारखान्यांमध्ये विविध प्रकारची कामे करतात. या कर्मचाऱ्यांच्या शरीरावर सेन्सर्स लावलेले असतात. या सेन्सर डेटाच्या आधारे रोबो हे समजून घेतो की, माणूस वेगवेगळी कामे कशी करतो आणि त्याची अचूक पद्धत कोणती आहे. बीजिंगमधील स्पिरिट एआयच्या डेटा ट्रेनिंग सेंटरमध्ये सामान्य लोक फ्रिजचे दार उघडणे, दरवाजा अनलॉक करणे आणि सुरीने भाजी कापणे यांसारखी घरातील छोटी-मोठी कामे करताना दिसत आहेत. रोबोंना या कामांमध्ये निष्णात करणे हा यामागचा उद्देश आहे. कंपनीच्या मते, ‘स्पिरिट एआय’चे रोबो दिवाणखान्यासारख्या नियंत्रित वातावरणात लहान-लहान कामे जवळपास ९० टक्के यशासह पूर्ण करू शकतात. ‘स्पिरिट एआय’कडे सध्या १२ पेक्षा जास्त Moz1 व्हील्ड ह्युमनॉईड रोबो युनिटस् उपलब्ध आहेत.