

बीजिंग : भविष्यात मानवाची बहुतांश कामे रोबो करणार आहेत, हे आता उघडच आहे. हे रोबो अधिक स्मार्ट आणि उपयुक्त बनवण्यासाठी जगभरातील कंपन्या नवनवीन तंत्रज्ञानावर काम करत आहेत. आता रोबोला माणसांप्रमाणेच दुरून येणाऱ्या वस्तू ओळखणे आणि हलक्या स्पर्शाची जाणीव होणे शक्य होणार आहे. साऊथ चायना युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजीच्या संशोधकांनी एक असा ‘फ्लेक्सिबल कॅपेसिटिव्ह सेन्सर’ विकसित केला आहे, जो रोबोला या दोन्ही क्षमता एकाच वेळी प्रदान करतो.
रोबोटिक्समध्ये दूरच्या वस्तू ओळखणे आणि स्पर्शाची जाणीव होणे या दोन भिन्न गोष्टी आहेत. सामान्यतः लहान इलेक्ट्रोड जवळच्या वस्तूंची अचूक माहिती देतात, तर मोठे इलेक्ट्रोड लांबच्या वस्तूंचा अंदाज घेतात. या दोन्ही गोष्टी एकाच सेन्सरमध्ये बसवणे कठीण होते; परंतु चिनी इंजिनिअरनी हे शक्य करून दाखवले आहे. संशोधकांनी सांगितले की, हे तंत्रज्ञान विकसित करताना मानवी डोळ्यांच्या कार्यपद्धतीचा आधार घेण्यात आला आहे. ज्याप्रमाणे आपण एखादे पुस्तक वाचताना डोळ्यांच्या बाहुल्या आकुंचन पावून बारीक अक्षरांवर लक्ष केंद्रित करतो आणि अंधारात लांबचे पाहताना त्या विस्तारतात, तोच तर्क येथे वापरला आहे. या सेन्सरमध्ये इलेक्ट्रोडच्या वर एक ‘शिल्डिंग लेयर’ (संरक्षक थर) लावला आहे. जेव्हा रोबोला एखादी नाजूक वस्तू पकडायची असते, तेव्हा हा लेयर सेन्सिंग एरिया आकुंचन पावतो, ज्यामुळे रोबोला बारीक स्पर्शही समजतो. चाचणी दरम्यान, या सेन्सरने 90 मिमी (9 सेमी) पेक्षा जास्त अंतरावरून येणाऱ्या वस्तूंचा शोध लावला. ‘हे अंतर कमी वाटत असले, तरी व्यस्त वातावरणात काम करताना एखादा रोबोटिक हात माणसाला धडकण्यापूर्वीच थांबण्यासाठी हे अंतर पुरेसे आहे,’ असे संशोधकांनी स्पष्ट केले. भविष्यातील उपयोगिता : नाजूक कामांसाठी : लहान वस्तूंचे कोपरे ओळखणे किंवा नाजूक वस्तू सुरक्षितपणे उचलणे रोबोला सोपे होईल. सुरक्षित सहकार्य : कारखाने किंवा रुग्णालयांत जिथे रोबो आणि माणसे एकत्र काम करतात, तिथे अपघातांचे प्रमाण कमी होईल. स्मार्ट निर्णय : आसपासच्या वातावरणातील बदल रोबो वेगाने समजू शकतील.