

नवी दिल्ली : येथील सफदरजंग रुग्णालयातील डॉक्टरांच्या चमूने एका 36 वर्षीय महिलेला रोबोटिक सर्जरीच्या मदतीने पोटातून फुटबॉलच्या आकाराचा ट्यूमर यशस्वीपणे काढून टाकला. महिलेला एड्रिनल ट्यूमर होता, जो आकाराने जगभरात आढळलेल्या ट्यूमरपैकी सर्वात मोठा असल्याचे समजते. हा ट्यूमर पोटातील इन्फीरियर वेना कावा, यकृत (लिव्हर) आणि उजव्या किडनीवर दबाव टाकत होता. डॉक्टरांच्या माहितीनुसार, ही जटिल रोबोटिक सर्जरी अत्यंत यशस्वी ठरली आहे.
18.2 x 13.5 सेंमी आकाराचा हा एड्रिनल ट्युमर सफदरजंग रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संदीप बंसल यांच्या मते, आतापर्यंत रोबोटिक पद्धतीने काढलेला सर्वात मोठा ट्यूमर आहे. ही सर्जरी युरोलॉजी आणि रीनल ट्रान्सप्लांट विभागाचे प्रमुख व प्राध्यापक डॉ. पवन वासुदेवा, तसेच डॉ. नीरज कुमार आणि डॉ. अविषेक मंडल यांच्या नेतृत्वाखाली पार पडली.
डॉ. वासुदेवा यांच्या मते, ट्यूमर केवळ आकाराने मोठा नव्हता, तर शरीरातील तीन महत्त्वाच्या अवयवांवर चिकटलेला होता, ज्यामुळे शस्त्रक्रिया अधिक अवघड झाली होती. ‘दा विंची रोबोट’च्या 3डी व्हिजन आणि अचूक रोबोटिक हातांच्या साहाय्याने ही जटिल सर्जरी पार पडली. सुमारे तीन तासांपेक्षा जास्त वेळ चाललेल्या या सर्जरीत ट्यूमर कोणत्याही गुंतागुंतीशिवाय पूर्णपणे काढण्यात आला.
ऑपरेशननंतर रुग्णाच्या प्रकृतीत कोणतीही समस्या उद्भवली नाही आणि तिला केवळ तीन दिवसांत रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. रोबोटिक सर्जरीमुळे छोट्या चिर्यांमधून सर्जरी करता येते, ऑपरेशननंतर कमी वेदना होतात, जलद रिकव्हरी होते आणि रुग्ण लवकर दैनंदिन कामकाजाला परतू शकतो. डॉ. वासुदेवा यांच्या मते, जर ही शस्त्रक्रिया पारंपरिक पद्धतीने केली असती, तर 20 सेंमीपेक्षा जास्त मोठा चिरा घ्यावा लागला असता, आणि रुग्णाला पूर्णपणे बरे होण्यासाठी आणखी काही आठवडे लागले असते.