वॉशिंग्टन : शास्त्रज्ञांनी एआय-रोबोकडून शस्त्रक्रिया करवून घेण्यात यश मिळवले आहे. अमेरिकेतील जॉन हॉपकिंस युनिव्हर्सिटीमधील (जेएचयू) रोबोने अतिशय गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करत सर्व डॉक्टरांनाही हैराण केले आहे. जेएचयूच्या संशोधकांनी सदर एआय रोबोला गुंतागुंतीच्या मेडिकल प्रोसिजरचे प्रशिक्षण दिले होते. यादरम्यान, या रोबोला डॉक्टर शस्त्रक्रिया करत असतानाचे पूर्ण व्हिडीओ दाखवण्यात आले होते. आश्चर्य म्हणजे रोबोने एखाद्या निष्णात डॉक्टरांप्रमाणे गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी करून दाखवली. संशोधकांनी याला ‘इमिटेशन लर्निंग’ असे संबोधले आहे.
संशोधकांचे आता असे म्हणणे आहे की, यापुढे शस्त्रक्रिया करण्यासाठी रोबोने प्रत्येक भागाचे प्रोग्रॅमिंग करण्याची आवश्यकता भासणार नाही. याचाच अर्थ असा आहे की, यापुढे रोबोकडून केली जाणारी शस्त्रक्रिया ही ऑटोमेटेड असणार आहे. त्याला कोणतेही सहाय्य करण्याची गरज भासणार नाही. जर्मनीतील म्युनिच येथे झालेल्या रोबोट लर्निंग कॉन्फरन्समध्ये याची माहिती दिली.
संशोधकांनी आपल्या अभ्यासात चॅटजीपीटीचाही या मॉडेलमध्ये समावेश केला आहे. यामुळे रोबोला गणितीय सूत्रांमध्ये वैद्यकीय भाषा शिकवली जाते, असे यात नमूद केले गेले आहे. संशोधकांनी आपल्या या मॉडेलला ‘दा विंची सर्जिकल सिस्टीम’ असे नाव दिले आहे. एआय रोबो अगदी रियल टाईममध्ये डॉक्टरांच्या शस्त्रक्रियेची नक्कल करू शकते, हीदेखील याची आणखी एक खासियत आहे. रोबोच्या बाहूत कॅमेरा, लायटिंग व व्हीजन कार्ट तैनात असून, यामुळे थ—ीडीमध्ये हाय डेफिनेशन व्हिज्युअल्स प्राप्त होत गेले. रोबोची प्रत्येक हालचाल यात टिपली गेली. रियल टाईममध्ये रोबोने सर्व प्रक्रिया अतिशय लीलया पार पाडली, असे या पूर्ण प्रक्रियेत दिसून आले. दा विंची सिस्टीमच्या या रोबोने डॉक्टरांचे अनेक व्हिडीओ पाहून टाके घालणे, टिश्यूसारखे महत्त्वपूर्ण मेडिकल प्रोसेस आत्मसात केले आणि हेच त्याच्या यशाचे मुख्य गमक ठरले. डॉक्टर खर्याअर्थाने तेथे थक्क झाले, जेथे रोबोने ज्या बाबी शिकवल्या किंवा दाखवल्या नव्हत्या, त्याही सहजपणे करून दाखवल्या. यामध्ये चुकून खाली पडलेल्या सूया गोळा करण्याचा प्रामुख्याने समावेश होता.