

बीजिंग : चीनमधील एका विद्यापीठात कार्यक्रमादरम्यान एका रोबोने चक्क एका तरुणीला घट्ट मिठी मारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्या तरुणीने स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न केला, पण रोबो तिला बिलगूनच राहिला. ही घटना एखाद्या सायन्स फिक्शन चित्रपटातील वाटत असली, तरी ती वास्तवात घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर, ’रोबोंमध्येही भावना निर्माण झाल्या आहेत का?’ असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
ही घटना चीनच्या जियान शहरातील ’ह्युमनॉईड रोबोट डेव्हलपमेंट सेंटर’ मध्ये घडली. एका ह्युमनॉईड रोबोने (मानवासारखा दिसणारा रोबो) एका महिलेला जबरदस्तीने मिठी मारली. रोबोने आपले दोन्ही हात महिलेच्या कमरेवर आणि हातांभोवती गुंडाळले होते. ही मिठी साधीसुधी नव्हती, तर एखाद्या मानवी प्रियकराप्रमाणे ती अत्यंत घट्ट आणि दीर्घकाळ होती. विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांनी या घटनेला ’एआय प्रोग्राममधील चूक’ असे संबोधले आहे. कंपनीने दिलेल्या स्पष्टीकरणानुसार कार्यक्रमाच्या ठिकाणी अनेक ड्रोन्स एकाच वेळी उडत होते. त्यांच्या सिग्नलमध्ये व्यत्यय आल्यामुळे रोबोचे वर्तन असामान्य झाले.
तज्ज्ञांच्या मते, हा रोबोटच्या मोशन कंट्रोल सिस्टममधील एक तांत्रिक दोष असू शकतो, ज्यामुळे त्याने चुकीची हालचाल केली. या घटनेवर सोशल मीडिया आणि तंत्रज्ञान विश्वात तीन प्रकारचे तर्क लावले जात आहेत: सोशल हग प्रोग्राम: काही लोकांच्या मते, रोबोमधील ’सोशल हग’ नावाचा प्रोग्राम टेस्टिंग दरम्यान चुकून सक्रिय झाला असावा. कमांडचा चुकीचा अर्थ: रोबोने दिलेल्या कमांडचा चुकीचा अर्थ काढला असावा (प्रोग्रामिंग बग), ज्यामुळे त्याने असे वर्तन केले. एम्बेस मोड: सर्वात धक्कादायक तर्क म्हणजे, हा रोबो विशेषतः एकटे राहणारे लोक किंवा वृद्धांसाठी डिझाईन केला आहे. त्यात असलेला ’एम्बेस मोड’ सक्रिय झाल्यामुळे त्याने महिलेला मिठी मारली असावी.