

बीजिंग : एखाद्या सायन्स-फिक्शन चित्रपटातील कथानक वाटावे, अशी एक घटना लवकरच प्रत्यक्षात येऊ शकते. लवकरच तुम्हाला एक ‘गर्भवती रोबो’ पाहायला मिळू शकतो, जो माणसाच्या बाळाला जन्म देईल. ही कल्पना धक्कादायक असली, तरी चीनमधील एक कंपनी पुढील एका वर्षाच्या आत असे तंत्रज्ञान विकसित करण्याच्या तयारीत आहे. मात्र, हे तंत्रज्ञान विकसित होण्यापूर्वीच त्यावरून एका मोठ्या वादाला सुरुवात झाली आहे.
‘ईसीएनएस डॉट सीएन’ या चिनी वेबसाईटच्या वृत्तानुसार, चीनची ‘कायवा’ (Kaiwa) नावाची टेक्नॉलॉजी कंपनी जगातील पहिला असा रोबो तयार करत आहे, जो गर्भधारणेचे अनुकरण (Simulation) करू शकतो. म्हणजेच, हा रोबो माणसांप्रमाणेच गर्भवती होऊ शकेल. हा रोबो पुढील एका वर्षात बाजारात येण्याची शक्यता असून, त्याची किंमत 1 लाख युआन (सुमारे 12 लाख भारतीय रुपये) असेल. ‘कायवा टेक्नॉलॉजी’ने विकसित केलेला हा रोबो पारंपरिक आयव्हीएफ किंवा सरोगसीपेक्षा पूर्णपणे वेगळा आहे. यामध्ये एक विशेष प्रकारचे ‘इनक्युबेशन पॉड’ आणि ‘रोबोटिक गर्भाशय’ असेल, जे महिलेच्या गर्भात असते, तसे वातावरण निर्माण करेल. हा रोबो गर्भधारणेपासून ते बाळाच्या जन्मापर्यंतच्या संपूर्ण प्रक्रियेची हुबेहूब नक्कल करण्याचा प्रयत्न करेल.
कंपनीचे म्हणणे आहे की, हे तंत्रज्ञान अशा लोकांसाठी उपयुक्त ठरेल, ज्यांना थेट बाळ हवे आहे. ‘कायवा टेक्नॉलॉजी’चे संस्थापक आणि सीईओ झांग किफेंग यांनी सांगितले की, हे रोबो विशेषतः अशा महिलांसाठी बनवले जात आहेत, ज्यांना मुले तर हवी आहेत; परंतु त्यांना गर्भधारणेच्या प्रक्रियेतून जायचे नाही. झांग यांनी सिंगापूरच्या नानयांग टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीमधून 2014 मध्ये पीएचडी केली आहे. त्यांची कंपनी यापूर्वी सर्व्हिस आणि रिसेप्शन रोबो बनवत होती. आता या नवीन प्रकल्पातून एक नवा विक्रम प्रस्थापित करण्याची कंपनीला आशा आहे. चीनच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘वीबो’वर या बातमीने धुमाकूळ घातला आहे. ही बातमी समोर येताच, तिला 10 कोटींहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.