

मकाऊ (चीन) : मकाऊच्या पटाने जिल्ह्यात 12 मार्च 2026 रोजी रात्री 9 च्या सुमारास एक विचित्र घटना घडली. एका मानवी रूपातील रोबोमुळे 70 वर्षीय वृद्ध महिला इतकी घाबरली की, तिला हृदयविकाराच्या त्रासामुळे रुग्णालयात दाखल करावे लागले. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला असून नेटकरी याला रोबोचा पहिला ‘पर्प वॉक’ (गुन्हेगाराला नेले जाते तसे नेणे) म्हणत आहेत.
मकाऊ येथील एक रहिवासी महिला पदपथावर आपला फोन पाहण्यासाठी थांबली होती. जेव्हा तिने मागे वळून पाहिले, तेव्हा तिच्यासमोर अचानक एक ‘णपळीींशश ॠ1’ मॉडेलचा मानवी रोबो उभा होता. पदपथ अरुंद असल्याने तो रोबो तिच्या अगदी मागे येऊन थांबला होता आणि त्याच्या अंगावरील फ्लॅशलाईट सुरू होते. अचानक समोर रोबोला पाहून ती महिला घाबरली आणि ओरडू लागली, ‘तू माझ्या हृदयाचे ठोके वाढवले आहेस! तुला काही कामधंदा नाही का? तू वेडा आहेस का?’ यावर उत्तर म्हणून रोबोने आपले दोन्ही हात हवेत वर केले. तज्ज्ञांच्या मते, अडथळा टाळण्यासाठी ही एक प्रोग््रााम केलेली कृती होती.
परंतु उपस्थितांनी तो रोबो ‘शरण’ येत असल्याचे मानले. घटनेची माहिती मिळताच दोन पोलिस अधिकारी घटनास्थळी पोहोचले. व्हायरल व्हिडीओमध्ये पोलिस 127 सेंटीमीटर उंच असलेल्या या रोबोच्या खांद्यावर हात ठेवून त्याला तिथून घेऊन जाताना दिसत आहेत. पोलिसांनी रोबोवर कोणताही गुन्हा दाखल केला नाही. परंतु त्याला सार्वजनिक ठिकाणाहून हटवून जप्त केले आहे. संबंधित वृद्ध महिलेला तपासणीसाठी रुग्णालयात नेण्यात आले होते. मात्र दुसऱ्या दिवशी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. तपासाअंती असे समोर आले की, हा रोबो ‘स्टडी हार्ड एज्युकेशन सेंटर’ नावाच्या संस्थेचा होता. संस्थेचे प्रमुख मॅक किन चोई यांनी स्पष्ट केले की, या रोबोचा वापर जाहिरातीसाठी केला जात होता.
एका 50 वर्षीय ऑपरेटरद्वारे त्याचे नियंत्रण केले जात होते आणि त्यावेळी रोबोच्या ‘नेव्हिगेशन सिस्टीम’ची चाचणी सुरू होती. पोलिसांनी संबंधित संस्थेला कडक ताकीद दिली असून, रोबो चालवताना आसपासच्या लोकांच्या सुरक्षिततेची आणि परिसराची काळजी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.