

बीजिंग : चीनच्या ‘युनिट्री’ या रोबोटिक्स कंपनीने बाजारपेठेत प्रवेश करण्यापूर्वी एका अत्यंत प्रगत ह्युमनॉईड (मानवसदृश) रोबोचे प्रात्यक्षिक सादर केले आहे, ज्याच्या वेगाने तंत्रज्ञान विश्वात मोठी खळबळ उडवून दिली आहे. कंपनीने या रोबोला ‘सुपरमॅन’ असे नाव दिले आहे. हा रोबो तब्बल १२.६६ मीटर प्रतिसेकंद (सुमारे ४५.६ किमी/तास) या वेगाने धावू शकतो आणि जागेवरूनच दोन मीटर (सुमारे ६.६ फूट) उंच उडी मारू शकतो, असा दावा करण्यात आला आहे.
युनिट्रीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पोस्ट करत दावा केला की, या रोबोने पृथ्वीवर मानवांनी बनवलेले आतापर्यंतचे सर्व वेगाचे रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. जगातील सर्वात वेगवान धावपटू उसेन बोल्टचा १२.४२ मीटर प्रति सेकंदाचा रेकॉर्डही या रोबोने मागे टाकला आहे. येत्या २२ ते २६ ऑगस्ट २०२६ दरम्यान बीजिंगमध्ये होणाऱ्या ‘वर्ल्ड ह्युमनॉईड रोबो गेम्स’मध्ये या रोबोचे प्रदर्शन केले जाणार आहे. युनिट्रीने दिलेल्या माहितीनुसार, सुपरमॅन रोबो विकसित करण्यासाठी तीन महिन्यांपेक्षा थोडा जास्त वेळ लागला. चाचणीदरम्यान याचा कमाल वेग १२.६६ मीटर प्रतिसेकंद नोंदवला गेला.
हाच वेग १०० मीटरच्या संपूर्ण अंतरापर्यंत कायम राहिल्यास रोबोचा वेग उसेन बोल्टपेक्षाही जास्त ठरेल, असा दावा कंपनीने केला आहे. मात्र, हा रोबो अद्याप विकासाच्या टप्प्यात असून येत्या काही महिन्यांत यात आणखी सुधारणा केल्या जातील. युनिट्री ही विक्रीच्या बाबतीत जगातील सर्वात मोठ्या ह्युमनॉईड रोबो उत्पादक कंपन्यांपैकी एक आहे. जुलैपर्यंत कंपनीने विविध मॉडेल्सचे सुमारे १८,००० ह्युमनॉईड रोबो बनवून डिलिव्हर केले आहेत. हे रोबो धावणे, डान्स करणे आणि मार्शल आर्टस्सारख्या क्रिया करताना दिसले आहेत. युनिट्रीचे संस्थापक वांग शिंगशिंग यांना चिनी अध्यक्ष शी जिनपिंग यांच्या प्रमुख टेक-उद्योजकांच्या परिषदेत पहिल्या रांगेत स्थान मिळाले होते. या स्टार्टअपला टेन्सेंट, अलिबाबा आणि डीपसीकसारख्या चीनमधील बड्या तंत्रज्ञान कंपन्यांचा पाठिंबा लाभला आहे.
युनिट्री ‘सुपरमॅन’ रोबोची वैशिष्ट्ये
या रोबोटची उंची १७० सेमी आणि वजन ४५ किलोग्रॅम आहे. त्याच्या पायांची लांबी ०.८५ मीटर (सुमारे २.८ फूट) आहे. वेग वाढवण्यासाठी त्याच्या गुडघ्यांवर आणि कटीभागावर शक्तिशाली इन-हाऊस परमनंट मॅग्नेट मोटर्सचा वापर करण्यात आला आहे. रोबोच्या वरच्या शरीरात दोन स्वतंत्र बॅटरी आणि कॉम्प्युटिंग स्टॅक्स बसवले आहेत, ज्यामुळे एका चार्जवर हा रोबो २ तासांपेक्षा जास्त वेळ काम करू शकतो. हा रोबो ‘NVIDIA’ कॉम्प्युट स्टॅकद्वारे संचालित होतो. यामध्ये वाय-फाय ६, ब्लूटूथ ५.२ आणि इथरनेट कनेक्टिव्हिटी देण्यात आली आहे. संपूर्ण शरीरात २० ‘डिग्री ऑफ फ्रीडम’ (DoF) असल्याने हा रोबो अत्यंत लवचिक आणि जलद हालचाली करतो.