

बीजिंग : चीन हा देश आपल्या प्रगत तंत्रज्ञानासाठी आणि अतरंगी शोधांसाठी जगभर ओळखला जातो. सोशल मीडियावर अनेकदा चीनमधील तंत्रज्ञानाचे थक्क करणारे व्हिडीओ व्हायरल होत असतात; पण यावेळी इंटरनेटवर एक असा व्हिडीओ समोर आला आहे, ज्याची कोणी स्वप्नातही कल्पना केली नसेल. या व्हायरल व्हिडीओमध्ये एक रोबो चक्क रस्त्यावर बसून हात जोडत भीक मागत असताना दिसत आहे.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर हा थक्क करणारा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओमध्ये एक मशिन म्हणजेच रोबो रस्त्याच्या कडेला गुडघ्यांवर बसलेला दिसत आहे. या रोबोच्या अगदी समोर एक ‘क्यूआर कोड’, एक प्लेट आणि एक बॅग ठेवलेली आहे. हा रोबो आपल्या हातातील प्लेट पुढे-मागे करून तिथून जाणाऱ्या लोकांकडे पैशांची मागणी करतो. विशेष म्हणजे, रस्त्यावरून जाणारे लोकही तिथे थांबून कौतुकाने त्याच्या प्लेटमध्ये पैसे टाकताना दिसत आहेत. हा अनोखा व्हिडीओ आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिला असून सध्या तो इंटरनेटवर प्रचंड चर्चेचा विषय बनला आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) आणि रोबोटिक्सच्या वाढत्या वापराच्या युगात या व्हिडीओने लोकांना हसवण्यासोबतच विचार करायलाही भाग पाडले आहे.
सोशल मीडियावर यूजर्सनी यावर अत्यंत मजेशीर कमेंटस् केल्या आहेत. एका यूजरने उपरोधिकपणे लिहिले, ‘रोबो आधीच माणसांच्या नोकऱ्या हिरावून घेत होते, आता त्यांनी माणसाची रस्त्यावर भीक मागण्याची शेवटची नोकरीही हिरावून घेतली आहे.’ दुसऱ्या एका यूजरने म्हटले, ‘एआयमुळे माणसांच्या नोकऱ्या गेल्या, म्हणून माणसांनी भीक मागणे सुरू केले. आता रोबो ही नोकरीही हिरावून घेत आहेत!’ भलेही हा व्हिडीओ एखाद्या प्रँकचा किंवा तंत्रज्ञानाच्या छोट्या प्रयोगाचा भाग वाटत असला, तरी यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की, येणाऱ्या काळात एआय आणि रोबोटिक्स हे आपल्या मानवी समाजाचा किती अविभाज्य आणि महत्त्वाचा भाग बनणार आहेत.