

न्यूयॉर्क : दिवसभराच्या दगदगीनंतर धापा टाकत घरी यावे, स्वयंपाकाचे काय, हा प्रश्न समोर मांडून ठेवलेला असावा, असे चित्र जर आपल्या घरी रोजचे असेल तर एलन मस्कचा एआय संचलित कुलिना रोबो यावरचा रामबाण उपाय ठरू शकेल, असाही दिवस आता फारसा दूर नसेल कदाचित. एलन मस्कने कुलिना हा एआय संचलित रोबो शेफच्या काही प्रायोगिक चाचण्यांची छायाचित्रे उपलब्ध करून दिली असून हा रोबो कुकिंग एक्सपर्ट असेल, असा मस्कचा दावा आहे.
मस्कने या रोबोचे अतिशय सुंदर वर्णन करताना हा शेफ कधीही विश्रांती घेणार नाही, जेवण करपवणार नाही आणि पगारवाढही मागणार नाही, असे म्हटले आहे. कुलिना एखाद्या स्मार्ट किचन गॅझेटपेक्षाही अधिक आधुनिक असल्याचा मस्कचा दावा आहे. गृहिणी, स्मार्ट किचन्स, रेस्टॉरंटस् या सर्वांना समोर ठेवत आपण कुलिनाची रचना केली असल्याचे याप्रसंगी सांगण्यात आले आहे.
कुलिना एक एआय संचालित, पूर्णपणे स्वयंचलित किचन सहायक असून तो अगदी एकापेक्षा एक सरस रेस्टॉरंट-गुणवत्तेच्या डिशेस तयार करून देतो. एआय संचलित शिक्षण प्रणाली यात ऑटो फिड असेल. त्यामुळे, कुलिनाचे अत्याधुनिक मशिन लर्निंग अल्गोरिदम हजारो रेसिपींचे विश्लेषण करतात आणि आपल्या पसंतीनुसार वेळोवेळी त्यांना मिळालेल्या ऑर्डरनुसार डिशेस तयार करतात. विशेष म्हणजे आपल्या आवडीचेही ते विशेष नोंदी ठेवतात. उदाहरणार्थ आपल्याला मसालेदार मॅगी आवडत असेल तर कुलिना ते लक्षात ठेवेल आणि भविष्यात कधी तरी स्वत:हूनही विचारेल की, मॅगी करू का?
कुलिनामध्ये उच्च-रिझोल्यूशन सेन्सर्सचा समावेश असतो. त्यामुळे कुलिना समाविष्ट घटक, त्याचे प्रमाण मोजते आणि त्यात काही विसरले असेल तर पर्यायी घटक देखील सुचवते. फ्रेंच पॅस्ट्रीज असेल, सुशी, इटालियन पास्ता, किंवा क्लासिक संडे रोस्ट, कुलिनाकडे या सर्व पदार्थांच्या रेसिपीची प्री-प्रोग्रॅम्ड तंत्रज्ञानाची एक लायब-री आहे जी प्रत्येक डिशला परफेक्ट बनवण्यासाठी आहे. एआय तुमच्या आहाराच्या गरजा आणि पसंती विचारात घेते. त्यातही इतके कमी की काय म्हणजे कुलिनामध्ये स्वयंचलित साफसफाईची सोय आहे. येथील पॅन धुण्याची, विसळण्याची यामुळे चिंताच रहात नाही.
कुलिना अॅपवर हजारो रेसिपींमधून स्क्रोल करता येतात आणि त्यानुसार आपल्याला जी डिश हवी असेल, ती सुचवता येते. कुलिना रोबो त्यासाठी लागणारे सर्व घटक आपल्या किचनमध्ये आहेत का, हे देखील पाहते आणि एखादी वस्तू नसेल तर त्याऐवजी अन्य कोणता पर्याय वापरता येईल, हे देखील सुचवते, असे यावेळी सांगण्यात आले आहे. कुलिना पहिल्या टप्प्यात अमेरिका, इंग्लंड, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि युरोपमधील स्वयंपाकघरांमध्ये क्रांती आणण्यासाठी सज्ज असेल, याचाही यात उल्लेख करण्यात आला आहे.