Heart Attack Risk | वाढत्या तापमानामुळे वाढतोय हार्ट अटॅकचा धोका

Heart Attack Risk |
Heart Attack Risk | वाढत्या तापमानामुळे वाढतोय हार्ट अटॅकचा धोका
Published on
Updated on

नवी दिल्ली : उत्तर भारतात गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा कडाका कमालीचा वाढला आहे. सातत्याने वाढणार्‍या या तापमानामुळे आता हृदयाशी संबंधित आजारांचा धोका निर्माण झाला आहे. कडक उन्हामुळे हार्ट अटॅक आणि हार्ट स्ट्रोकचा धोका कसा वाढतो, यावर प्रसिद्ध कार्डियोलॉजिस्ट डॉ. मनोज कुमार यांनी प्रकाश टाकला असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

डॉक्टरांच्या मते, वाढत्या उष्णतेचा आपल्या ‘कार्डिओव्हस्कुलर सिस्टम’वर (रक्ताभिसरण संस्थेवर) अत्यंत वाईट परिणाम होतो. जेव्हा तापमान खूप वाढते, तेव्हा शरीर स्वतःला थंड ठेवण्यास असमर्थ ठरते, ज्यामुळे थेट हृदयावरचा ताण वाढतो. जास्त तापमानामुळे शरीरातील पाणी कमी होते आणि रक्त चिकट (घट्ट) होऊ लागते. नसांमध्ये रक्त घट्ट झाल्यामुळे रक्तप्रवाहात अडथळा येतो. संथ रक्तप्रवाहामुळे शरीराला रक्ताचा पुरवठा करण्यासाठी हृदयाला नेहमीपेक्षा जास्त मेहनत करावी लागते आणि रक्त जोरात पंप करावे लागते. यामुळे अचानक स्ट्रोक किंवा हार्ट अटॅक येण्याचा धोका वाढतो.

अतिउष्णतेमुळे शरीराला भरपूर घाम येतो. घामावाटे शरीरातील सोडियम आणि पोटॅशियम सारखी महत्त्वाची खनिजे बाहेर पडतात. शरीरात या घटकांची कमतरता निर्माण झाल्यास हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता बळावते. हृदय निरोगी ठेवण्यासाठी आणि उन्हाच्या त्रासापासून वाचण्यासाठी डॉक्टरांनी पुढील महत्त्वाचे उपाय सांगितले आहेत : शरीर हायड्रेट ठेवा. शरीरात पाण्याची कमतरता भासू देऊ नका. जास्तीत जास्त पाणी प्या. पाण्यासोबतच आहारात ताजी फळे आणि भाज्यांचा समावेश करा. (उदा. काकडी, टरबूज खाणे फायदेशीर ठरते).

दुपारी बाहेर जाणे टाळा : उन्हाळ्याच्या दिवसांत दुपारी 12 ते 4 या वेळेत घराबाहेर पडणे टाळा, कारण या काळात उन्हाची तीव्रता सर्वात जास्त असते. काही महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जावे लागल्यास स्वतःला कपड्याने पूर्णपणे झाकून (कव्हर करून) बाहेर पडा. जे लोक आधीपासूनच हृदयाचे रुग्ण आहेत, त्यांनी उन्हाळ्यात सरसकट जास्त पाणी पिणे टाळावे. हृदय रुग्णांनी सर्वप्रथम आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि डॉक्टरांनी जितके लीटर पाणी पिण्यास सांगितले आहे, तितकेच पाणी प्यावे. स्वतःच्या मनाने पाण्याचे प्रमाण वाढवणे त्यांच्यासाठी घातक ठरू शकते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news