Climate change impact | वाढत्या तापमानामुळे जमिनीतील सूक्ष्मजीवांच्या वर्तनात बदल

Climate change impact |
Climate change impact | वाढत्या तापमानामुळे जमिनीतील सूक्ष्मजीवांच्या वर्तनात बदल
Published on
Updated on

लंडन : वाढत्या जागतिक तापमानाचा परिणाम केवळ हिमनद्यांवरच नाही, तर जमिनीच्या आत असलेल्या सूक्ष्मजीवांवरही होत असल्याचे एका नवीन अभ्यासात समोर आले आहे. ‘ग्लोबल चेंज बायोलॉजी’ या शोधपत्रिकेत प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, उत्तर गोलार्धातील वाढत्या उष्णतेमुळे जमिनीतील सूक्ष्मजीव नायट्रोजन या पोषक घटकाचा वापर करण्याच्या त्यांच्या नैसर्गिक पद्धतीत बदल करत आहेत.

सामान्यतः, जमिनीतील सूक्ष्मजीव नायट्रोजनचे पुनर्वापर करतात. ते मातीतून नायट्रोजन शोषून घेतात आणि त्याचे रूपांतर अमोनियम व नायट्रेटस्सारख्या अजैविक स्वरूपात करतात, जे वनस्पतींच्या वाढीसाठी आवश्यक असते. मात्र, तापमानात वाढ झाल्यामुळे हे सूक्ष्मजीव आता स्वतःसाठी जास्त नायट्रोजन राखून ठेवत आहेत आणि वातावरणात सोडल्या जाणार्‍या नायट्रोजनचे प्रमाण कमी करत आहेत. यामुळे संपूर्ण परिसंस्थेतील नायट्रोजनचा प्रवाह बदलू शकतो, ज्याचा परिणाम वनस्पतींच्या वाढीवर होऊन पर्यावरणाचे तापमान अधिक वेगाने वाढण्याची शक्यता आहे. हे निष्कर्ष आईसलँडमधील ‘ह्वेरागेर्दी’ जवळील उपआर्क्टिक गवताळ प्रदेशात केलेल्या प्रयोगातून समोर आले आहेत.

2008 मध्ये आलेल्या भूकंपामुळे या भागातील भूगर्भातील उष्ण पाण्याचे प्रवाह बदलले होते, ज्यामुळे जमिनीचे तापमान नैसर्गिकरीत्या 0.5 ते 40 अंश सेल्सिअसपर्यंत वाढले. शास्त्रज्ञांसाठी ही एक नैसर्गिक प्रयोगशाळाच ठरली, जिथे त्यांना दीर्घकालीन उष्णतेचा पर्यावरणावर होणारा परिणाम अभ्यासता आला. या संशोधनादरम्यान शास्त्रज्ञांनी मातीत ‘नायट्रोजन-15’ मिसळून त्याचा मागोवा घेतला. संशोधनात असे आढळले की, सुरुवातीचे नुकसान: उष्ण मातीत सूक्ष्मजीव अतिशय सक्रिय होतात, ज्यामुळे नायट्रोजनयुक्त संयुगे जमिनीतील पाण्यात मिसळतात किंवा ‘नायट्रस ऑक्साईड’ या हरितगृह वायूच्या रूपात हवेत विरघळतात. बदललेली रणनीती : कालांतराने, सूक्ष्मजीवांनी नायट्रोजन बाहेर सोडण्याऐवजी तो स्वतःमध्येच साठवून ठेवण्यास सुरुवात केली.

अमोनियम उत्सर्जन बंद: सूक्ष्मजीवांनी वनस्पतींना उपयुक्त ठरणारा ‘अमोनियम’ हा घटक बाहेर सोडणे बंद केले आहे. स्पेनमधील शास्त्रज्ञ सारा मारॅनॉन जिमेनेझ यांनी याचे वर्णन करताना सांगितले की, ‘हा सूक्ष्मजीवांच्या चयापचय क्रियेतील असा उपउत्पादित भाग आहे, जो वनस्पतींसाठी खतासारखा असतो; पण आता तो बाहेर सोडला जात नाहीये.’ जर सूक्ष्मजीवांनी वनस्पतींना नायट्रोजन देणे बंद केले, तर झाडांची वाढ खुंटू शकते. झाडे कमी झाली, तर वातावरणातील कार्बन डायऑक्साईड शोषण्याचे प्रमाणही कमी होईल, ज्यामुळे ‘ग्लोबल वॉर्मिंग’ची समस्या अधिक गंभीर होऊ शकते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news