

नवी दिल्ली : आरोग्य ही निसर्गाकडून मिळालेली सर्वात मोठी देणगी आहे. मात्र, बदलत्या काळाच्या ओघात आपण आपल्या शरीराकडे थोडे दुर्लक्ष करत आहोत की काय, असा प्रश्न सध्या समोर येत आहे. द लॅन्सेट या प्रख्यात वैद्यकीय नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या एका ताज्या संशोधनानुसार, जगात मधुमेहाचे प्रमाण चिंताजनक रितीने वाढत आहे. विशेषतः आपल्या भारत देशात 2024 मध्ये सुमारे 9 कोटी प्रौढ व्यक्ती मधुमेहासह जीवन जगत आहेत, ज्यामुळे भारत जगात दुसर्या क्रमांकावर पोहोचला आहे.
या अहवालानुसार, चीन 14.8 कोटी रुग्णांसह पहिल्या क्रमांकावर असून, अमेरिका 3.9 कोटी रुग्णांसह तिसर्या क्रमांकावर आहे. इंटरनॅशनल डायबेटिस फेडरेशनच्या संशोधकांनी सांगितले की, वाढती लोकसंख्या, शहरीकरण आणि वाढते वय ही या आजाराच्या प्रसाराची मुख्य कारणे आहेत. जगातील प्रत्येक नऊ प्रौढ व्यक्तींमागे एक व्यक्ती आज या विकाराने ग्रस्त आहे. धक्कादायक बाब म्हणजे, 2024 मध्ये जगभरात 58.9 कोटी लोकांना असलेला हा आजार 2050 पर्यंत 85.3 कोटींपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.
हा अहवाल सांगतो की, मध्यम आणि कमी उत्पन्न असलेल्या देशांमध्ये मधुमेहाचा प्रभाव सर्वाधिक आहे. शहरी भागात राहणार्या लोकांमध्ये आणि पुरुषांमध्ये हा त्रास अधिक प्रमाणात दिसून येतो. 75 ते 79 वयोगटातील ज्येष्ठांमध्ये तर याचे प्रमाण 25 टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. ही केवळ आकडेवारी नसून ती आपल्याला आपल्या रोजच्या सवयींकडे डोळसपणे पाहण्यास भाग पाडणारी एक साद आहे.
संशोधकांनी ही बाब अधोरेखित केली आहे की, ही साथ रोखण्यासाठी आता सामूहिक प्रयत्नांची गरज आहे. पण घाबरून जाण्याचे कारण नाही. आपल्या पूर्वजांनी सांगितलेली साधी जीवनशैली वेळेवर आहार, पुरेसा व्यायाम आणि मनाची शांतता या त्रिसूत्रीच्या जोडीने आपण मधुमेहावर मात करू शकतो. मधुमेहाशी लढणे म्हणजे केवळ औषधे घेणे नव्हे, तर स्वतःच्या शरीराशी असलेले नाते पुन्हा नव्याने जोडणे होय. आपल्या भविष्यातील पिढीला निरोगी आयुष्य देण्यासाठी आजपासूनच सावध आणि संयमी राहणे, हाच यावरील खरा उपाय आहे.