

मुंबई : ‘भिकारी’ हा शब्द ऐकताच आपल्या डोळ्यासमोर अनेकदा गरिबी, भूक आणि रस्त्यावरील खडतर जीवनाचे चित्र उभे राहते, पण भरत जैन यांची कहाणी या सर्व कल्पनांना छेद देणारी आहे. ‘जगातील सर्वात श्रीमंत भिकारी’ म्हणून ओळखले जाणारे भरत जैन यांनी अनेक वर्षांची चिकाटी आणि हुशारीने घेतलेल्या आर्थिक निर्णयांच्या जोरावर करोडोंची संपत्ती निर्माण केली आहे. त्यांची ही जीवनगाथा कोणत्याही यशस्वी उद्योजकापेक्षा कमी नाही!
मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस किंवा आझाद मैदानाबाहेर अनेकदा दिसणारे भरत जैन, वरकरणी इतर सामान्य भिकार्यांसारखेच वाटू शकतात, पण त्यांच्या साध्या आणि काहीशा जीर्ण झालेल्या वेशाआड एक अशी व्यक्ती आहे, ज्यांची एकूण संपत्ती तब्बल 7.5 कोटी रुपये इतकी आहे. त्यांच्या दैनंदिन कमाईचा आकडाही थक्क करणारा आहे. दररोज सुमारे 2000 ते 2500 रुपये, म्हणजेच महिन्याला अंदाजे 60,000 ते 75,000 रुपये. ही कमाई भारतातील अनेक कॉर्पोरेट कंपन्यांमधील चांगल्या पदावरील व्यक्तीच्या सुरुवातीच्या पगारापेक्षाही जास्त असू शकते.
भरत जैन यांचा जन्म अत्यंत गरीब कुटुंबात झाला आणि त्यांना औपचारिक शिक्षण घेण्याची संधी मिळाली नाही. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती इतकी हलाखीची होती की, अनेकदा दोन वेळच्या जेवणाचीही भ्रांत असायची. गरजेपोटी त्यांनी भीक मागण्यास सुरुवात केली आणि हेच काम त्यांनी पुढे सुमारे 40 वर्षे, दिवसाचे 10 ते 12 तास, आठवड्याचे सातही दिवस, कोणतीही सुट्टी न घेता केले. मिळणार्या पैशांचा अपव्यय न करता, भरत जैन यांनी अत्यंत हुशारीने गुंतवणूक केली. त्यांनी मुंबईत दोन फ्लॅट खरेदी केले, ज्यांची आजची एकत्रित किंमत सुमारे 1.4 कोटी रुपये आहे. या फ्लॅटमुळे त्यांच्या पत्नी, दोन मुले, वडील, भाऊ यांना आरामदायी आणि सुरक्षित जीवन मिळाले आहे. याशिवाय, ठाण्यात त्यांची दोन दुकाने आहेत, जी त्यांनी भाड्याने दिली असून, त्यातून त्यांना दरमहा 30,000 रुपयांचे स्थिर भाडे मिळते.
औपचारिक शिक्षण नसतानाही त्यांची गुंतवणूक करण्याची समज आणि दूरद़ृष्टी वाखाणण्याजोगी आहे. आपल्या कमाईतून भरत जैन यांनी आपल्या दोन्ही मुलांना मुंबईतील एका नामांकित कॉन्व्हेंट शाळेत उत्तम शिक्षण दिले. आज त्यांची दोन्ही मुले कुटुंबाच्या स्टेशनरी व्यवसायात मदत करत आहेत, जो त्यांच्या उत्पन्नाचा आणखी एक स्रोत बनला आहे. जैन यांनी एकेकाळी केवळ स्वप्नात पाहिलेले सुरक्षित आणि मध्यमवर्गीय जीवन आज त्यांचे कुटुंब जगत आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, एवढी संपत्ती आणि उत्पन्नाचे अनेक स्रोत असूनही, भरत जैन आजही भीक मागण्याचे काम करतात. काहींच्या मते ही त्यांची अनेक वर्षांची सवय आहे, तर काहीजण याला त्यांची साधेपणा आणि नम्रता मानतात. त्यांच्या कुटुंबाने त्यांना आता हे काम थांबवण्याची अनेकदा विनंती केली आहे, कारण आता ते आर्थिकद़ृष्ट्या पूर्णपणे सक्षम आहेत; मात्र जैन यांनी आपल्या दशकांच्या दिनक्रमाला चिकटून राहणे पसंत केले आहे, ज्याने त्यांना एकेकाळी जगण्यासाठी आधार दिला होता.