Rhinoceros Fossil | कॅनेडियन आर्क्टिकमध्ये गेंड्याचे जीवाश्म ध्रुवीय प्रदेश होता एकेकाळी शीतोष्ण

Rhinoceros Fossil
Rhinoceros Fossil | कॅनेडियन आर्क्टिकमध्ये गेंड्याचे जीवाश्म ध्रुवीय प्रदेश होता एकेकाळी शीतोष्ण
Published on
Updated on

लंडन : जवळपास चाळीस वर्षांपूर्वी कॅनेडियन हाय आर्क्टिकमधील एका उल्कापातामुळे तयार झालेल्या विवरात संशोधकांना उत्तम प्रकारे जतन झालेले जीवाश्मांचे एक संकलन सापडले होते. आता त्या अवशेषांनी अखेर आपले रहस्य उघड केले आहे. हे जीवाश्म 2.3 कोटी वर्षांपूर्वी अस्तित्वात असलेल्या शिंग नसलेल्या गेंड्याच्या एका नामशेष प्रजातीचे असल्याचे सिद्ध झाले आहे. शिवाय या गेंड्याच्या तेथील अस्तित्वामुळे एकेकाळी ऊबदार असलेल्या या ध—ुवीय प्रदेशाचा इतिहासही दिसून येतो.

शास्त्रज्ञांनी या प्राण्याला एपिअ‍ॅथेरासेरियम इजिलिक ( Epiatheracerium itjilik) असे नाव दिले आहे. या प्रजातीचे नाव ‘इन्क्वीटुट’ ( Inuktitut) भाषेतील ‘बर्फ‘ किंवा ‘बर्फाळ‘ ( frost or frosty) या अर्थाच्या शब्दावरून ठेवले आहे. कॅनेडियन म्युझियम ऑफ नेचरच्या (CMN) निवेदनानुसार, हे प्राणी आधुनिक भारतीय गेंड्यांच्या ( Rhinoceros unicornis) आकाराचे होते. नव्याने ओळखले गेलेले हे जीवाश्म आजपर्यंत सापडलेले एकमेव नमुने आहेत आणि ते दर्शवतात की, हा प्राणी अज्ञात कारणांमुळे प्रौढ होण्यापूर्वीच मरण पावला असावा.

सीएमएनच्या पॅलेओबायोलॉजिस्ट आणि अवशेषांच्या नवीन विश्लेषणाच्या सहलेखिका मॅरिसा गिल्बर्ट यांनी निवेदनात म्हटले की, या आर्क्टिक गेंड्याच्या जीवाश्मांची हाडे उत्कृष्ट स्थितीत आहेत, हे खूप लक्षणीय आहे. ती त्रिमितीय पद्धतीने जतन केली गेली आहेत आणि केवळ अंशतःच खनिजांनी बदलली गेली आहेत. सुमारे 75 टक्के सांगाडा सापडला आहे, जो एका जीवाश्मासाठी अविश्वसनीयपणे संपूर्ण आहे. ‘ही हाडे 23 किलोमीटर (14 मैल) रुंदीच्या उल्कापात विवरामध्ये जतन झाली. कारण, हे विवर जलद गतीने पाण्याने भरले गेले होते.

ज्या काळात हा आर्क्टिक गेंडा जिवंत होता, त्याच सुमारास एका लघुग्रहामुळे किंवा धूमकेतूमुळे हे विवर तयार झाले होते. याचा अर्थ असा की, हे विवर तलाव होण्यापूर्वीच गेंडा त्यात मरण पावला असावा. निवेदनानुसार, त्या काळात या प्रदेशातील हवामान आजच्यापेक्षा खूप उबदार होते. वनस्पतींचे अवशेष दर्शवतात की कॅनेडियन हाय आर्क्टिक (विशेषतः नुनाव्हटमधील डेव्हॉन बेट, जिथे हे विवर आहे) येथे शीतोष्ण जंगल होते. मायोसीन युगातून (2.3 कोटी ते 53 लाख वर्षांपूर्वी) प्लायोसीन युगात (53 लाख ते 26 लाख वर्षांपूर्वी) संक्रमण झाले आणि शेवटी गेल्या हिमयुगाची सुरुवात झाली.

या काळात, गोठणे आणि वितळणे या चक्रांमुळे हे जीवाश्म तुटले आणि हळूहळू विवराच्या पृष्ठभागावर ढकलले गेले. त्यानंतर 1986 मध्ये संशोधकांना हे जीवाश्म सापडले. विवराच्या पुढील मोहिमांमध्ये आर्क्टिक गेंड्याच्या आणखी हाडांचे नमुने मिळाले. या मोहिमांमध्ये चालणारा सील पुईजिला डार्विनी (Puijila darwini) ही 2.3 कोटी वर्षांपूर्वीची दुसरी प्रजातीदेखील सापडली, जी कदाचित आर्क्टिक गेंड्यासोबत राहत असावी.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news