

वॉशिंग्टन : आपली पृथ्वी भविष्यकाळात कशी दिसेल याचे कुतुहल सर्वांनाच असते. आता खगोलशास्त्रज्ञांनी आणखी 8 अब्ज वर्षांनी पृथ्वी कशी दिसू शकते हे दर्शवणार्या एका बाह्यग्रहाचा शोध घेतला आहे. या ग्रहाला ‘केएमटी-2020-बीएलजी-0414’ असे नाव देण्यात आले असून, तो पृथ्वीपासून 4 हजार प्रकाशवर्ष अंतरावर आहे. एका सफेद खुजा तार्याभोवती हा खडकाळ, कठीण पृष्ठभागाचा ग्रह फिरतो. आपला सूर्यही आणखी 5 अब्ज वर्षांनंतर अशाच सफेद खुजा तार्यामध्ये रुपांतरीत होईल. त्यानंतरच्या काळात आपली पृथ्वीही अशा ग्रहासारखीच दिसेल व त्याच्याभोवती फिरेल!
सूर्यामध्ये असे परिवर्तन होण्यापूर्वी त्याचे रुपांतर आधी एका लाल, महाकाय तार्यामध्ये होईल व तो जवळच्या चिमुकल्या बुध ग्रहाला गिळंकृत करील. कदाचित शुक्र व मंगळही त्याच्या भक्ष्यस्थानी पडतील. जर त्याच्या तावडीतून आपला ग्रह सुटलाच तर तो या बाह्यग्रहासारखाच दिसेल. संशोधकांनी याबाबतची माहिती ‘नेचर अॅस्ट्रॉनॉमी’ या नियतकालिकात दिलेली आहे. युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया सॅन दियागोमधील खगोलशास्त्रज्ञ केमिंग झांग यांनी याबाबतचे संशोधन केले आहे. त्यांनी सांगितले की, आणखी 6 अब्ज वर्षांनी पृथ्वी ‘रेड जायंट’ बनलेल्या सूर्याच्या तावडीतून वाचेल की नाही हे माहिती नाही. मात्र, विशाल लाल तारा बनलेल्या सूर्याच्या भक्ष्यस्थानी पडण्यापूर्वी पृथ्वीवरील महासागरांची वाफ होऊन जाईल. एखादा तारा त्याच्या बव्हंशी आयुष्यात हायड्रोजनचे हेलियममध्ये फ्युजन होऊन जळत असतो. ज्यावेळी त्यांच्यामधील हायड्रोजन इंधन संपते, त्यावेळी तो हेलियमचे फ्युजन करू लागतो. त्यामुळे प्रचंड प्रमाणात ऊर्जा निर्माण होऊन तो त्याच्या मूळ आकारापेक्षा हजारो पट अधिक मोठा होऊ लागतो. असे तारे आपल्या आजूबाजूच्या ग्रहांनाही स्वतःमध्ये सामावून घेऊ लागतात. असेच द़ृश्य हा ग्रह व त्याच्या तार्यामधून दिसत आहे. ही ग्रहमालिका आपल्या ‘मिल्की वे’ नावाच्या आकाशगंगेच्या मध्यवर्ती भागात आहे. 2020 मध्ये ही ग्रहमालिका सर्वप्रथम शोधण्यात आली होती. आता त्यावर नवे संशोधन झाले आहे.