

वॉशिंग्टन : जगभरात हरेक नमुन्याचे रोबो बनवलेले आहेत. मानवाकृती रोबोंपासून ते श्वानाच्या आकाराच्या रोबोंपर्यंत अनेक रंगरूपातील हे रोबो आहेत. आता संशोधकांनी पक्ष्यासारख्या, विशेषतः कावळ्यासारख्या दिसणार्या रोबोची निर्मिती केली आहे. अर्थात, हा रोबो कावळ्याच्या रंगाचा नसून केवळ आकाराचा आहे. हा रोबो जमिनीवर उड्या मारू शकतो, चालू शकतो तसेच आकाशात कावळ्यासारखेच उड्डाणही करू शकतो. हा रोबोट म्हणजे एक अद्ययावत ड्रोन आहे.
या रोबोला कावळ्याचेच ‘रावेन’ हे नाव दिले असले, तरी या नावाचा लाँग फॉर्म ‘रोबोटिक एव्हियन-इन्स्पायर्ड व्हेईकल फॉर मल्टिपल एन्व्हायर्न्मेंटस्’ असे आहे. हे एक नवे रिमोट-कंट्रोल्ड-ड्रोन प्रोटोटाईप असून, त्यामध्ये पंख आणि दोन पायही आहेत. वेगवेगळ्या परिस्थितीत काम करण्यासाठी तसेच प्रचलित ड्रोनपेक्षा अधिक सरसपणे उड्डाण करण्यासाठी त्यामध्ये अशा नव्या सुविधा देण्यात आल्या आहेत. याबाबतच्या संशोधनाची माहिती ‘नेचर’ या नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आली आहे. असे फिक्स्ड-विंग ड्रोन हे क्वॉडकॉप्टरसारख्या प्रॉपेलर विंग्ज असलेल्या ड्रोनपेक्षा अधिक सरसपणे काम करू शकतात. क्वॉडकॉप्टरसारख्या ड्रोनना जनीवरून आकाशात उड्डाण करण्यासाठी विमानांप्रमाणे मोठे रनवे लागतात. काही ड्रोन हे थेट हवेत सोडता येतात; पण त्यांचा सर्वच ठिकाणी योग्य वापर करता येऊ शकतो, असे नाही. मात्र ‘रावेन’ वेगवेगळ्या परिस्थितीत काम करण्यासाठी अनुकूल असे ड्रोन किंवा रोबोट आहे. एखादा पक्षी उंच ठिकाणावरून थेट आकाशात झेप घेतो तसे हे ड्रोन आकाशात जाऊ शकते. ‘रावेन’ ला एकाच प्रोपेलरने चालवता येते. त्याला मागे लांब शेपूटही असते. ‘रावेन’चे वजनही खर्या कावळ्याइतके 600 ग्रॅम आहे. त्याच्या पंखांचा विस्तार 40 इंचांचा असून, बॉडी 20 इंचांची आहे. त्याचे पाय लवचिक असून, ते जमिनीवर चालण्यासाठी योग्य प्रकारे बनवलेले आहेत. कठीण पृष्ठभागावरही हा ‘कावळा’ आरामात चालू शकतो. इतकेच नव्हे, तर उड्याही मारू शकतो. या ड्रोनचा टेकऑफचा वेग प्रति सेकंद 7.9 फूट इतका आहे.