

सॅन फ्रॅन्सिस्को : हिमालयाने बर्याच काळापासून कुतूहल आणि आश्चर्य निर्माण केले आहे. आता त्याच्या खाली काय सुरू आहे, याचे रहस्य नुकतेच उघड झाले आहे. नवीन संशोधन असे दर्शवते की, भारतीय टेक्टोनिक प्लेट केवळ सरकत नाही, तर ती पृथ्वीच्या खाली खूप दूर खेचली जात आहे. शास्त्रज्ञांनी पूर्वी असे गृहीत धरले होते की, भारतीय प्लेट आशियाच्या खाली सहजतेने सरकली आहे. या प्रक्रियेमुळे पर्वत हळूहळू वर येतील, असे गृहीत धरले जात होते. पण, आता नवीन डेटा काहीतरी वेगळेच दर्शवतो.
शास्त्रज्ञांना असे आढळून आले की, भारतीय प्लेट दोन भागांत विभागली जात आहे. हे तिबेटच्या सुमारे 100 किलोमीटर अंतरावर घडत आहे. सॅन फॅ्रन्सिस्कोमधील एका मोठ्या परिषदेत हे नवीन संशोधन सादर करण्यात आले. त्याचे नेतृत्व चीनच्या महासागर विद्यापीठाचे लिन लिऊ करत होते. त्यांच्या गटाने प्लेटची हालचाल शोधण्यासाठी भूकंपीय इमेजिंगचा वापर केला. त्यांना पृथ्वीच्या पृष्ठभागाखाली खूप खाली विघटन झाल्याचे पुरावे आढळले.
दरम्यान, त्याचा वरचा थर अजूनही वर सरकत राहतो. ही एक दुर्मीळ घटना आहे आणि खंडीय टक्करमध्ये सहसा दिसून येत नाही. लिऊच्या संशोधकांनी तिबेटमधील 94 भूकंप केंद्रांवरील डेटा तपासला. त्यांनी एस-वेव्ह, शीअर वेव्ह आणि पी-वेव्हचे बारकाईने परीक्षण केलं. या डेटावरून त्यांनी प्लेटची थ—ीडी इमेज तयार केली. प्लेटचे काही भाग अजूनही पृष्ठभागाखाली अखंड आहेत; पण इतर भाग प्रचंड ताणाखाली वेगळे होत आहेत. काही तुकडे आवरणात खाली ओढले जात आहेत, असे त्यांना यात आढळून आले आहे.