

लंडन : डीएनए हा सजीवांचा मूलभूत आनुवंशिक घटक आहे, पण कालांतराने तो नष्ट होतो. वैज्ञानिक डीएनएच्या टिकाऊपणाबद्दल आणि तो किती काळ टिकू शकतो याबद्दल संशोधन करत आहेत. जगातील सर्वात प्राचीन डीएनएचा नमुना ग्रीनलँडमधील एका 2.4 दशलक्ष वर्षांपूर्वीच्या परिसंस्थेमधून मिळाला आहे. हा शोध डीएनए किती काळ टिकू शकतो, यावर नवीन प्रकाश टाकतो. डीएनएच्या टिकाऊपणाची मर्यादा यावर संशोधन सुरु आहे. डीएनए हा एक अत्यंत नाजूक रेणू आहे.
सजीव मेल्यानंतर, डीएनए लगेचच खंडित होण्यास (डिगे्रड) सुरुवात करतो. डीएनएचे आयुष्य मुख्यत्वे विविध घटकांवर अवलंबून असते. त्यामध्ये तापमान महत्वाचे ठरते. थंड आणि स्थिर तापमान डीएनएला सर्वाधिक काळ टिकवून ठेवते. आर्द्रता आणि पाणी डीएनएचे विघटन जलद करते. सूक्ष्मजीव अर्थात जीवाणू आणि बुरशी डीएनएचा नाश करतात. ग्रीनलँडमध्ये सापडलेले हे डीएनए नमुने जगातील सर्वात जुने म्हणजे 2.4 दशलक्ष वर्षांपूर्वीचे आहेत. यापूर्वीचा विक्रम सुमारे 1 दशलक्ष वर्षांचा होता. ग्रीनलँडसारख्या अत्यंत थंड आणि गोठलेल्या वातावरणात, जिथे तापमान खूप कमी असते, तेथे डीएनएचे विघटन अत्यंत हळू होते, ज्यामुळे ते लाखो वर्षे टिकून राहू शकते, असे शास्त्रज्ञांचे मत आहे.
या प्राचीन डीएनएचे विश्लेषण करून शास्त्रज्ञांनी 2.4 दशलक्ष वर्षांपूर्वीच्या त्या परिसंस्थेतील वनस्पती आणि प्राणी यांच्याबद्दल माहिती मिळवली आहे. शास्त्रज्ञ यापेक्षाही जुने डीएनए शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. तथापि, सध्याच्या अंदाजानुसार, डीएनए टिकून राहण्याची एक नैसर्गिक मर्यादा आहे. ग्रीनलँडमधील हा शोध प्राचीन जीवशास्त्र आणि उत्क्रांती यांचा अभ्यास करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण मैलाचा दगड ठरला आहे.