

लंडन : ‘अॅस्ट्रोफिजिकल जर्नल लेटर्स’ नावाच्या एका वैज्ञानिक मासिकात एक नवीन संशोधन प्रकाशित झाले आहे. या संशोधनात एका रहस्यमय गामा-किरण स्फोटाबद्दल माहिती दिली आहे, ज्यामुळे वैज्ञानिक गोंधळात पडले आहेत. साधारणपणे, अशा प्रकारचे स्फोट तेव्हा होतात, जेव्हा एखादा मोठा तारा पूर्णपणे नष्ट होतो. या घटनेतून प्रचंड ऊर्जा बाहेर पडते, जी ब्रह्मांडात क्वचितच दिसते. पण, या खास गामा-किरण स्फोटाची घटना एकाच दिवशी अनेक वेळा घडली. याचा अर्थ असा की, एखादा तारा एकदा नव्हे तर वारंवार नष्ट होत होता. एखादा तारा एकदा नष्ट झाल्यावर पुन्हा जिवंत होऊ शकत नाही, त्यामुळे या घटनेने संशोधकांना हैराण केले आहे.
आयर्लंडच्या युनिव्हर्सिटी कॉलेज डब्लिनचे वैज्ञानिक आणि या संशोधनाचे लेखक मार्टिन-कैरिलो यांनी सांगितले की, “गेल्या 50 वर्षांत पाहिलेल्या कोणत्याही गामा-किरण स्फोटापेक्षा ही घटना पूर्णपणे वेगळी आहे.” त्यांनी पुढे सांगितले की, “गामा-किरण स्फोट अत्यंत विनाशकारी असतात, त्यामुळे ते फक्त एकदाच होतात. कारण स्फोटानंतर तो तारा शिल्लक राहत नाही.” एकाच तार्यात अनेक वेळा स्फोट झाल्याचे हे पहिलेच उदाहरण नाही. अशा घटना ‘बायनरी स्टार सिस्टिम’ मध्ये घडतात, जिथे एक पांढरा बटू तारा आणि एक सामान्य तारा एकमेकांच्या जवळ असतात.
जेव्हा ते एकमेकांच्या जवळ येतात, तेव्हा पांढरा बटू तारा दुसर्या तार्याची ऊर्जा शोषून घेतो. यामुळे एक मोठा थर्मोन्यूक्लियर स्फोट होतो, जो दोन्ही तार्यांना नष्ट करतो. या संशोधनाचे दुसरे लेखक, रेडबाऊड युनिव्हर्सिटीचे वैज्ञानिक अँर्ड्यू लेवन म्हणाले, “हे स्फोट इतर गामा-किरण स्फोटांपेक्षा 100 ते 1000 पट जास्त काळ टिकले.” मार्टिन यांनी सांगितले की, “गामा-किरणे वारंवार येत होती, जे याआधी कधीच पाहिले नव्हते.” या स्फोटाचे मूळ शोधण्यासाठी वैज्ञानिकांनी चिली येथील ‘व्हेरी लार्ज टेलिस्कोप’ मधील HAWK- I नावाच्या कॅमेर्याचा वापर केला. यातून त्यांना कळले की ही गामा-किरणे अब्जावधी प्रकाश-वर्षांपासून येत आहेत. असा अंदाज आहे की, एखादे ब्लॅक होल एका तार्याला गिळत असावे; मात्र ही केवळ एक शक्यता असून, या गामा-किरणांचे खरे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.