Ancient Egyptian Fort | इजिप्तमध्ये 3500 वर्षांपूर्वीच्या किल्ल्याचे सापडले अवशेष

Ancient Egyptian Fort
Ancient Egyptian Fort | इजिप्तमध्ये 3500 वर्षांपूर्वीच्या किल्ल्याचे सापडले अवशेषFile Photo
Published on
Updated on

कैरो : इजिप्तच्या ‘न्यू किंगडम’ कालखंडातील (अंदाजे 1550 ते 1300 ईसपूर्व) बांधकाम केवळ भव्य मंदिरे आणि स्मारकांपुरतेच मर्यादित नव्हते, तर त्यांनी भूमध्य समुद्राच्या किनार्‍यावर संरक्षणासाठी किल्ल्यांची एक मोठी साखळी उभी केली होती. या साखळीतील आजवरच्या सर्वात मोठ्या किल्ल्यांपैकी एकाचा शोध नुकताच लागला आहे. 3500 वर्षांपूर्वीच्या या किल्ल्याचे क्षेत्रफळ 86,000 चौरस फूट आहे.

इजिप्तच्या पर्यटन आणि पुरातन वास्तू मंत्रालयाने उत्तर सिनाईच्या वाळूच्या ढिगार्‍यांमध्ये या किल्ल्याचा शोध लागल्याचे म्हटले आहे. हा किल्ला 1980 च्या दशकात याच ठिकाणी सापडलेल्या पूर्वीच्या किल्ल्यापेक्षा तीन पटीने मोठा आहे, ज्यामुळे हा शोध अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. इजिप्तचे पर्यटन आणि पुरातन वास्तू मंत्री शरीफ फथी यांनी सांगितले की, या किल्ल्याच्या बांधकामातून प्राचीन इजिप्तच्या लोकांचे त्यांच्या भूमीच्या संरक्षणासाठी एकीकृत संरक्षण प्रणाली तयार करण्याचे नियोजन किती बुद्धिमत्तापूर्ण होते, हे दिसून येते. हा शोध इजिप्तच्या व्यापक लष्करी इतिहासाची नवीन प्रकरणे सांगण्यास आणि सिनाईचे अद्वितीय सांस्कृतिक महत्त्व अधोरेखित करण्यास मदत करेल.

हा किल्ला एका महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा भाग होता, ज्याला ‘होरास वॉर रोड’ म्हणून ओळखले जाते. हा रस्ता किनार्‍यावरून जाणारा रणनीतिक मार्ग होता, जो नाईलचे खोरे आणि पॅलेस्टाईन यांना जोडत होता. या मार्गावर संरक्षणासाठी किल्ल्यांचे एक मोठे जाळे होते. सर्वोच्च पुरातन वास्तू परिषदेचे सरचिटणीस मोहम्मद इस्माईल खालिद यांनी सांगितले की, ‘आम्हाला सापडलेला प्रत्येक किल्ला पूर्वेकडील सीमेवरील इजिप्तच्या संरक्षण नेटवर्कची अधिक संपूर्ण माहिती मिळवून देतो.’ वाळूच्या सतत बदलणार्‍या ढिगार्‍यांमुळे उत्खनन करणे आव्हानात्मक होते. उत्खनन करणार्‍या टीमला किल्ल्याची दक्षिणी भिंत मिळाली, जी 344 फूट लांब आणि आठ फूट रुंद आहे.

ही भिंत अनेकवेळा पुन्हा बांधली गेली होती. याशिवाय, या ठिकाणी 11 संरक्षक मनोरे आणि पश्चिम बाजूस सुमारे 246 फूट लांबीची नागमोडी भिंत सापडली आहे. इजिप्शियन पुरातन वास्तू विभागाचे प्रमुख मोहम्मद अब्देल बदी यांच्या मते, ही नागमोडी रचना एक विशिष्ट स्थापत्य आणि संरक्षणात्मक वैशिष्ट्य दर्शवते. किल्ल्याच्या आत, संशोधकांना 18 व्या राजघराण्याच्या पूर्वार्धातील मातीची भांडी आणि अन्य वस्तू मिळाल्या आहेत, ज्यात फेरो थुटमोस पहिला याच्या नावाचा शिक्का असलेली भांड्याची मूठ देखील आहे. किल्ल्यातील सैनिकांच्या दैनंदिन गरजा पूर्ण होत असल्याचे पुरावेही मिळाले आहेत. टीमला भाकरी भाजण्याची भट्टी आणि भाजलेल्या पीठाचे अवशेषही सापडले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news