

न्यूयॉर्क : जगातील पहिला चॅटबॉट म्हणून ‘एलिझा’ची ओळख आहे. जोसेफ विझेनबॉम यांनी हा चॅटबॉट विकसित केला होता. आता संशोधकांनी नुकतेच त्याला खूप वर्षांपूर्वी गमावलेल्या कॉम्प्युटर कोडने पुनर्जीवन दिले असून हा चॅटबॉट अद्यापही अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करीत आहे.
मॅसाच्युसेटस् इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या अर्काईव्हमधून त्याच्याशी संबंधित धूळ खात पडलेल्या प्रिंटआऊटस् शोधून काढण्यात आल्या. त्या शोधणार्या ‘सॉफ्टवेअर आर्कियोलॉजिस्टस्’ना 60 वर्षांपूर्वी हरवलेला डीफंक्ट कोड सापडला आणि या कोडमुळे ‘एलिझा’ला पुनर्जीवन मिळाले! 1960 च्या दशकात ‘एमआयटी’चे प्राध्यापक जोसेफ विझेनबॉम यांनी ‘एलिझा’ हा चॅटबॉट विकसित केला होता. त्यांनी त्याला ‘एलिझा डुलिटल’ असे नाव दिले होते. हे नाव ‘पिग्मॅलियन’ या नाटकातील एका पात्राचे आहे. ते एखाद्या उच्चभ—ू बि—टिश महिलेप्रमाणे ‘कसे बोलावे?’ हे शिकवत असतो. ‘एलिझा’ हे एक लँग्वेज मॉडेल होते. सध्याच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच ‘एआय’वर ‘एलिझा’चा मोठा प्रभाव आहे. सध्याच्या चॅटबॉटप्रमाणेच या ‘एलिझा’ला प्रश्न विचारले जात होते व ‘एलिझा’ आपल्या डाटाच्या सहाय्याने उत्तर देत होती. उदा. एलिझा विचारते की ‘तुझी कोणती समस्या आहे हे सांग’. त्यावर यूजरने म्हटले की ‘सगळे पुरुष सारखेच असतात!’ त्यावर ‘एलिझा’ म्हणते, ‘कोणत्या अर्थाने?’ विझेनबॉम यांनी एलिझाचे लिखाण त्यांनी शोधलेल्या व सध्या प्रचलित नसलेल्या एका प्रोग्रॅमिंग लँग्वेजमध्ये केले होते. या भाषेला त्यांनी ‘मिशिगन अल्गोरिदम डीकोडर सिमेट्रिक लिस्ट प्रोसेसर (मॅड-स्लिप) असे नाव दिले होते. मात्र ती लवकरच ‘लिस्प’ लँग्वेजमध्ये कॉपी झाली आणि सुरुवातीच्या इंटरनेटच्या काळात ‘एलिझा’चे लिस्प वर्जन व्हायरल झाले व मूळ व्हर्जन मागे पडून लुप्त झाले. आता स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीतील जेफ श्रागर व एमआयटी अर्काईविस्ट माईल्स क्रोले यांनी एलिझाच्या कोडला विझेनबॉग यांच्या पेपर्समधून शोधून काढले आहे.