Red-Haired Portraits | लाल केसांच्या पोर्ट्रेटस्‌मधून उलगडला अमेरिकनांना जोडणारा ‘सुवर्ण धागा’

Red-Haired Portraits |
Red-Haired Portraits | लाल केसांच्या पोर्ट्रेटस्‌मधून उलगडला अमेरिकनांना जोडणारा ‘सुवर्ण धागा’
Published on
Updated on

बॉस्टन/एडिनबर्ग : स्कॉटलंडमधील नामांकित छायाचित्रकार किएरन डॉड्स यांनी गेल्या दशकात तांबूस/लाल केस (Ginger Hair) असलेल्या लोकांच्या काढलेल्या पोर्ट्रेटस्‌च्या (छायाचित्रांच्या) आधारे एक अनोखा अभ्यास आणि पुस्तकाची निर्मिती केली आहे. ‘जिंजर हेअर पोर्ट्रेटस्‌’ या कलात्मक उपक्रमातून विविध वंशांच्या अमेरिकन नागरिकांना एकमेकांशी जोडणारा एक अदृश्य, पण मजबूत ‘सुवर्ण धागा’ समोर आला आहे.

‘जिंजर पोर्ट्रेटस्‌’ प्रकल्पाची पार्श्वभूमी स्वतः तांबूस केस असणारे ४५ वर्षीय छायाचित्रकार किएरन डॉडस्‌ यांनी २०१३ मध्ये स्कॉटलंडमध्ये या छायाचित्रण मालिकेची सुरुवात केली होती. जगभरातील लाल केस असलेल्या लोकांचे फोटो टिपल्यानंतर २०२० मध्ये त्यांचे ‘Gingers’ हे पुस्तक प्रसिद्ध झाले. परंतु, त्या पुस्तकात अमेरिकन नागरिकांचा समावेश नसल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी अमेरिकेत प्रवास करून ‘Gingers of America’ या नव्या पुस्तकाची निर्मिती केली. अमेरिकेत संपूर्ण जग एका सूक्ष्म रूपात वसलेले आहे आणि तिथल्या लोकांमध्ये जनुकीय विविधता खूप मोठी आहे, हे त्यांना या प्रवासात प्रकर्षाने जाणवले. ओक्लाहोमा येथील ‘मुस्कोगी (क्रीक) नेशन’चे जॉशुआ इलियट आणि ‘कोमांचे’ जमातीची लॉटी वाहकिनी यांच्यासारख्या मूळ अमेरिकन नागरिकांमध्ये लाल केस आढळले.

यातील बहुतेकांच्या पूर्वजांमध्ये स्कॉटिश, आयरिश, इंग्रजी किंवा स्वीडिश वंशावळ असल्याचे स्पष्ट झाले. १८ व्या आणि १९ व्या शतकात युरोपातील नागरिक आणि मूळ अमेरिकन आदिवासी यांच्यात झालेल्या आंतरजातीय विवाहांमुळे हे जनुक आजच्या पिढीपर्यंत पोहोचले आहे. ‘चेरोकी’ जमातीची लाकिया ही मुलगी याला अपवाद ठरली, जिच्या कुटुंबात युरोपियन वंशाचा कोणताही इतिहास माहीत नसतानाही तिचे केस गडद रुबी लाल रंगाचे आहेत. जगभरात फक्त १ टक्का ते २ टक्के लोकांमध्येच नैसर्गिक तांबूस/लाल केस असतात. किएरन यांच्या अभ्यासानुसार, अमेरिकेत हे प्रमाण सुमारे ४ टक्के आहे. ‘जिंजरटाऊन’ संकल्पना अमेरिकेतील सर्व तांबूस केस असणारे लोक एकत्र आल्यास १.४ कोटींची (जिंजरटाऊन) मोठी लोकसंख्या बनेल.

लाल केस हे अमेरिकेच्या विविध, गुंतागुंतीच्या आणि ऐतिहासिक स्थलांतराला एका सूत्रात बांधणारे साधन आहे. अनेकदा तांबूस केस असणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या रंगावरून चिडवले जाते. परंतु, किएरन यांच्या मते, ‘जिंजर’ या शब्दांत एक सुवर्णछटा दडलेली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news