

लिमा, (पेरू) : सोन्याच्या विक्रमी दरवाढीचा फटका पेरूव्हियन अॅमेझॉनच्या जंगलाला बसला आहे. सोन्याच्या किमतींचा फायदा घेण्यासाठी गुन्हेगारांच्या सशस्त्र टोळ्यांनी पेरूव्हियन अॅमेझॉनच्या जंगलात घुसखोरी करुन अवैधरित्या सोने खाणकाम केल्याने आतापर्यंत 1,40,000 हेक्टर वर्षावन (रेनफॉरेस्ट) तोडले गेले आहे. या विनाशाचा वेग वाढत आहे. ‘मॉनेटरिंग ऑफ द अँडियन मेझॉन प्रोजेक्ट’ आणि त्यांची पेरूव्हियन भागीदार संस्था कंझर्व्हेशन मेझॉनिका यांनी एका अहवालाद्वारे हे निष्कर्ष जगासमोर आणले आहेत.
1984 पासून दक्षिण अमेरिकेतील या पेरू देशात खाणकामासाठी सुमारे 540 चौरस मैल भूभाग साफ करण्यात आला आहे आणि पर्यावरणीय विनाश देशभरात झपाट्याने पसरत आहे. सोन्याच्या शोधात असलेल्या गुन्हेगारी टोळ्या, माफिया या जंगल परिसरातील जलस्रोतांनाही विषारी करत आहेत. बेकायदेशीर खाणकाम करणारे ‘ड्रेजेस’ नावाच्या तरंगणार्या मशीनचा वापर करतात, जी नदीपात्रे उकरून गाळ बाहेर टाकतात. गाळातून सोने काढण्यासाठी वापरला जाणारा विषारी पारा (मर्क्युरी) या प्रक्रियेत नदीतच सोडला जातो. ‘मॉनेटरिंग ऑफ द अँडियन अॅमेझॉन प्रोजेक्ट (एमएएपी)’ आणि त्याची पेरूव्हियन भागीदार संस्था कंझर्व्हेशन अॅमेझॉनिका यांनी प्रथमच अल्ट्रा-उच्च रिझोल्यूशन असणार्या हवाई प्रतिमांचा वापर करत जंगलतोडीचे भयानक वास्तव पुढे आणले. या प्रतिमांमुळे जंगलतोडीसोबतच ड्रेजेसचा गैरवापर ओळखणे शक्य झाले. देशाच्या दक्षिणेकडील माद्रे दे डियोस भागापुरता मर्यादित असलेले हे पर्यावरणीय संकट आता इतरत्रही पसरू लागले.
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमतीत विक्रमी वाढ होत असताना, सशस्त्र गुन्हेगार, माफियांच्या टोळ्या सोन्याच्या शोधात आदिवासींच्या जंगलांचा नाश करत आहेत आणि नद्यांना विषारी बनवत आहेत, यामुळे आदिवासी समूह संतप्त झाले आहेत. एमएएपीच्या हवाई छायाचित्रांवरून दिसून येते की एकेकाळी घनदाट हिरवीगार जंगल असलेली जमीन आता हिरव्या पाण्याने भरलेल्या डबक्यांनी भरलेल्या राखाडी रंगाच्या, निर्जीव चंद्रभूमी मध्ये रूपांतरित झाली आहे. पार्यामुळे नदीकाठच्या भागात प्रदूषण आणि विष पसरत आहे. पारा प्रथम माशांमध्ये आणि नंतर मासे खाणार्या लोकांमध्ये पसरतो.
गुन्हेगारीशास्त्रज्ञ आणि इंटरनॅशनल क्रायसिस ग्रुपचे सल्लागार, ब्रॅम एबस म्हणतात की, सोन्याच्या किमती वाढल्यामुळे, परदेशी आणि सशस्त्र गट पेरूच्या जंगलांमध्ये घुसखोरी करत आहेत. कोलंबियातील ‘कॉमांडोस दे ला फ्रोंटेरा’ आणि ब्राझीलमधील ‘कमांडो व्हर्मेलो’ यांसारखी आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी नेटवर्क कोकेनची तस्करी करत आहेत आणि बेकायदेशीर सोन्याच्या खाणकामातून मिळणारा नफा वापरून मनी लाँडरिंग करत आहेत. अँडियन ग्रुपने पेरू सरकारला बेकायदेशीर खाणकामावर त्वरित नियंत्रण मिळवण्यास सांगितले आहे, अन्यथा आर्थिक निर्बंधांना सामोरे जावे लागेल, असा इशारा दिला आहे. मॅट फायनर यांनी इशारा दिला आहे की, सोन्यामुळे आता खूप नफा होत आहे. किमती कमी होण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत, त्यामुळे परिस्थिती सुधारण्यापूर्वी ती अधिक वाईट होण्याची शक्यता आहे.