RBI First Note | रिझर्व्ह बँकेने पहिली नोट किती रुपयांची जारी केली होती?

RBI first banknote 5 rupees history
RBI First Note | रिझर्व्ह बँकेने पहिली नोट किती रुपयांची जारी केली होती?Pudhari File Photo
Published on
Updated on

नवी दिल्ली : आज आपण अनेक चलनी नोटा वापरतो; पण भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) जेव्हा पहिल्यांदा कागदी नोट जारी केली, तेव्हा ती किती रुपयांची होती, हे तुम्हाला माहीत आहे का? या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला चकित करेल; कारण ती तुमच्या अपेक्षेनुसार 1, 2 किंवा 100 रुपयांची नव्हती. चला, RBI च्या पहिल्या नोटेचा रंजक इतिहास जाणून घेऊया.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना 1 एप्रिल 1935 रोजी झाली. त्यावेळी भारत ब्रिटिशांच्या राजवटीखाली होता. RBI ने आपल्या स्थापनेच्या तीन वर्षांनंतर, म्हणजेच जानेवारी 1938 मध्ये, पहिली कागदी नोट जारी केली. ही नोट 5 रुपयांची होती आणि त्यावर ब्रिटिश सम्राट किंग जॉर्ज सहावा यांचे चित्र होते. त्यानंतर त्याच वर्षी, RBI ने 10, 100, 1,000 आणि 10,000 रुपयांच्या नोटाही जारी केल्या. 10,000 रुपयांची नोट मुख्यतः व्यापारी आणि मोठ्या व्यवहारांसाठी वापरली जात होती; पण 1946 मध्ये ब्रिटिश सरकारने ती बंद केली.

1947 मध्ये देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर, 1949 मध्ये RBI ने स्वतंत्र भारताची पहिली नोट जारी केली. ही नोट 1 रुपयाची होती. या नोटेवर किंग जॉर्ज यांच्या चित्राऐवजी अशोक स्तंभाचे लायन कॅपिटल छापण्यात आले होते. ही नोट भारताच्या स्वातंत्र्याचे आणि नवीन सुरुवातीचे प्रतीक बनली. त्यानंतर 1950 मध्ये 2, 5, 10 आणि 100 रुपयांच्या नोटा जारी करण्यात आल्या. आज आपण ज्या नोटा पाहतो, त्यावर महात्मा गांधीजींचे चित्र असते; पण स्वातंत्र्यानंतर अनेक वर्षे नोटांवर त्यांचे चित्र नव्हते.

1969 मध्ये, महात्मा गांधींच्या 100 व्या जयंतीनिमित्त, RBI ने पहिल्यांदा 100 रुपयांच्या नोटेवर त्यांचे चित्र छापले. त्यानंतर 1996 पासून ‘महात्मा गांधी सीरिज’च्या नोटांनी जुन्या नोटांची जागा घेतली आणि आज गांधीजींचे चित्र आपल्या चलनी नोटांवर सामान्य झाले आहे. या माहितीवरून हे स्पष्ट होते की, स्वातंत्र्यपूर्व काळात RBI ने पहिली नोट 5 रुपयांची जारी केली होती आणि त्यानंतर अनेक वर्षांनी म्हणजे स्वातंत्र्यप्राप्तीनंतर 1 रुपयाची नोट आली. भारतीय चलनाचा हा प्रवास देशाच्या इतिहासाचे आणि बदलाचे एक महत्त्वाचे प्रतीक आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news