

नवी दिल्ली : भारतात भेट देण्यासारखी अनेक पर्यटनस्थळे आहेत. त्याचबरोबर अशीही ठिकाणे आहेत की, त्यांचे स्वतःचे वैशिष्ट्य आहे. तेथील अनोख्या आश्चर्यांविषयी अनेकांना माहीत नाही. त्याविषयीच जाणून घेऊया.
राजस्थानातील देशनोके येथे करणी मातेचे प्रसिद्ध मंदिर आहे. या मंदिरात वीस हजारांहून अधिक उंदीर आहेत. ज्यांना कब्बा म्हणून ओळखले जाते. या उंदरांना करणी मातेचा अवतार मानले जात असल्याने त्यांची पूजा केली जाते. मंदिरात रोज शेकडो भाविक या उंदरांची पूजा करण्यासाठी आणि त्यांना खायला घालण्यासाठी येतात. तेथे पांढर्या उंदरांना शुभ मानले जाते आणि क्वचित आढळतात. या मंदिरात उंदरावर पाय देणे पाप मानले जाते.
गुजरातमध्ये अहमदाबादच्या लाल दरवाजा भागात असणारे लकी रेस्टॉरंट एका स्मशानभूमीवर बांधले आहे. तेथे दफन करण्यात आलेल्या कबरींच्या आजूबाजूलाच टेबल आणि खुर्च्या आहेत. लकी रेस्टॉरंटमध्ये येणारे लोक कबरींच्या बाजूला बसूनच चहा, कॉफीसह खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतात.
ओम सिंग नावाचे एक जण बाईकवरून घरी जात असताना त्यांचा अपघात होऊन त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर त्यांची दुचाकी पोलिस ठाण्यामध्ये नेण्यात आली. मात्र, ही दुचाकी ठाण्यामधून गायब झाली आणि दुर्घटनास्थळी सापडली. त्यानंतर पुन्हा ती पोलिस ठाण्यामध्ये नेण्यात आली असता आधीसारखेच घडले. पोलिसांनी दुचाकीला साखळीने बांधून ठेवले. तरीही ती पुन्हा अपघाताच्या ठिकाणी सापडली. त्यानंतर, बाईक कायमची अपघाताच्या ठिकाणी ठेवण्यात आली आणि तिथे या बाईकचे मंदिर झाले.
तामिळनाडूतील महाबलीपूरम येथे कृष्णाचा बटरबॉल म्हणून ओळखला जाणारा 250 टन वजनाचा दगड आहे. तो 5 मीटर रुंद आणि 20 मीटर उंच आहे. विशेष म्हणजे तो झुकलेल्या स्थितीत असल्याने कोणत्याही क्षणी कोसळू शकतो, असे भासते. मात्र, गेली कित्येक दशके तो स्थिर आहे.
कोलकाता येथील बोटॅनिकल गार्डनमध्येअसलेले वडाचे झाड दूरवरून घनदाट जंगलासारखे दिसते. प्रत्यक्षात ते एकच झाड आहे. या झाडाला सुमारे 3,600 मुळे असून, ती संपूर्ण क्षेत्रात पसरली आहेत. त्यामुळे जंगलाचा आभास होतो. हे झाड जगातील सर्वाधिक रुंद असल्याचे सांगितले जाते.