Tooth-in-Eye Surgery | दुर्मीळ ‘टूथ-इन-आय’ शस्त्रक्रिया ठरली वरदान

वीस वर्षांनंतर अंध व्यक्तीला मिळाली दृष्टी
Tooth-in-Eye Surgery | दुर्मीळ ‘टूथ-इन-आय’ शस्त्रक्रिया ठरली वरदान
Published on
Updated on

लंडन : वैद्यकीय क्षेत्रात एक अत्यंत दुर्मीळ आणि चमत्कारिक शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे. कॅनडामधील ब्रेंट चॅपमन या ३४ वर्षीय व्यक्तीला तब्बल वीस वर्षांनंतर ‘टूथ-इन-आय’ किंवा ‘ऑस्टिओ-ओडोन्टो-केराटोप्रॉस्थेसिस’ (ओओकेपी) या अत्यंत क्लिष्ट शस्त्रक्रियेद्वारे पुन्हा दृष्टी प्राप्त झाली आहे. चॅपमन यांच्या डोळ्यात त्यांचाच दात आणि त्यावर बसवलेली कृत्रिम लेन्स वापरून ही शस्त्रक्रिया करण्यात आली.

चॅपमन वयाच्या १३ व्या वर्षी एका बास्केटबॉल सामन्यादरम्यान घेतलेल्या ‘आयबुप्रुफेन’ औषधामुळे गंभीर ॲलर्जीचा (स्टीव्हन्स-जॉन्सन सिंड्रोम) बळी ठरले होते. या दुर्मीळ आजारामुळे त्यांच्या संपूर्ण शरीरावर जळजळ झाली आणि डोळ्यांच्या कॉर्नियाचे अतोनात नुकसान झाले. परिणामी, त्यांनी दृष्टी गमावली आणि गेल्या २० वर्षांत त्यांचे जवळपास ५० वेळा कॉर्निया प्रत्यारोपण अपयशी ठरले होते. अखेर, युनिव्हर्सिटी ऑफ ब्रिटिश कोलंबियाचे कॉर्नियल सर्जन डॉ. ग्रेग मोलोनी यांनी त्यांच्यावर ही अनोखी शस्त्रक्रिया केली.

कशी केली जाते ही शस्त्रक्रिया?

दाताचा वापर : या प्रक्रियेत रुग्णाचा सुळ्याचा दात (केनाइन टूथ), त्याच्याभोवतीचा हाडांचा पातळ थर आणि रक्तवाहिन्यांसह काढला जातो. दाताला हव्या त्या आकारात कापून त्यात एक प्लास्टिकची ऑप्टिकल लेन्स बसवली जाते. त्यानंतर हा भाग काही महिने रुग्णाच्या गालात किंवा पापणीत रोपण केला जातो, जेणेकरून शरीराच्या पेशींशी तो एकरूप होईल सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यावर हा दाताचा भाग डोळ्याच्या पुढील भागात बसवला जातो, त्‍यामुळे प्रकाश थेट डोळ्याच्या पडद्यापर्यंत (रेटिना) पोहोचू शकतो आणि दृष्टी पूर्ववत होते. या यशस्वी शस्त्रक्रियेनंतर चॅपमन यांना आता स्पष्ट दृष्टी मिळाली आहे. वीस वर्षांनंतर त्यांनी पुन्हा एकदा जगाचे सौंदर्य अनुभवले असून, आपल्या पुतण्या-भाचीला पाहण्यासोबतच पुन्हा कामावर जाण्याची त्यांची इच्छा आता पूर्ण होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news