

त्रिपोली : २०१७ मध्ये मोहम्मद अलमुंतसिर या छायाचित्रकाराने यूट्यूबवर पोस्ट केलेल्या अवघ्या १८ सेकंदांच्या एका व्हिडीओमुळे प्राणी जगतात एक मोठा शोध लागला आहे. लिबियाच्या वाळवंटात झुडुपाखाली सावलीत बसलेल्या ‘सँड कॅट’ (वाळवंटी मांजर) या अत्यंत दुर्मीळ आणि लाजाळू वन्यप्राण्याचे लिबियातील हे पहिलेच अधिकृत पुरावे ठरले आहेत.
अलमुंतसिर यांना हे प्राणी आधीही दिसले होते. परंतु, रात्रीच्या वेळी योग्य कॅमेरा उपलब्ध नसल्यामुळे ते चित्रीकरण करू शकले नव्हते. हे प्राणी लिबियात आधीपासूनच नोंदवलेले असतील, असा त्यांचा समज होता. मात्र, उत्तर आफ्रिकेतील लहान मांसाहारी प्राण्यांचे तज्ज्ञ फिरास हायडर यांनी अलमुंतसिर यांच्याशी संपर्क साधला, तेव्हा हे स्पष्ट झाले की ‘सँड कॅट’ (फेलिस मार्गारेटा) या प्रजातीची लिबियात ही पहिलीच अधिकृत नोंद आहे.
त्यानंतर, अलमुंतसिर आणि हायडर यांनी इतर संशोधन सहकाऱ्यांच्या मदतीने तब्बल आठ वर्षे संशोधन केले. या अभ्यासाचे निष्कर्ष ‘जर्नल ऑफ एरिड एन्व्हायर्नमेंटस्’मध्ये ‘रीडिस्कव्हरिंग डेझर्ट घोस्टस्’ या नावाने प्रसिद्ध झाले आहेत. या काळात अलमुंतसिर यांनी वाळवंटातील १३ वेगवेगळ्या ठिकाणी २४ वेळा या मांजरींच्या नोंदी ठेवल्या.
ही वाळवंटी मांजर अत्यंत लहान (कमाल ३.५ किलो) आणि हुशार असते. ती प्रामुख्याने रात्रीच्या वेळी शिकार करते आणि दिवसभरात वाळूतील गुहेत राहते. पाण्याच्या अभावात ती शिकारीच्या रक्तातील पाण्याचा वापर करून जिवंत राहू शकते. मात्र, हा शोध लागला असला तरी या प्रजातीवर धोक्याची टांगती तलवार आहे. हवामान बदलाचा थेट परिणाम या प्राण्यांवर होत असून, बेकायदेशीर पाळीव प्राण्यांच्या बाजारात विक्री आणि शिकार यामुळे ही प्रजाती धोक्यात येत आहे. लोकांमध्ये जनजागृती करून या दुर्मीळ वाळवंटी मांजरींचे संरक्षण करणे अत्यंत गरजेचे असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे.