

तेलअवीव : इस्रायलच्या भूमध्य समुद्र किनाऱ्याजवळ पुरातत्त्व शास्त्रज्ञांना एक अत्यंत विस्मयकारक आणि दुर्मीळ शोध लागला आहे. एका हाय-स्पीड रेल्वे प्रकल्पाच्या कामासाठी सुरू असलेल्या उत्खननाच्या अगदी शेवटच्या दिवशी, एका प्राचीन रोमन मोठ्या वाड्याच्या रिकाम्या दारूच्या हौदात (वाईन वॅट) १७०० वर्षे जुने, उत्कृष्ट स्थितीत असलेले संगमरवरी दोन मानवी पुतळे सापडले आहेत.
सापडलेले पुतळे सुमारे दोन फूट उंच आणि प्रत्येकी १३२ पाऊंड (सुमारे ६० किलो) वजनाचे आहेत. यातील एका पुतळ्यावर ‘लायकरगस’ हे नाव कोरलेले आहे. इतिहासकारांच्या मते, हा प्राचीन स्पार्टा शहराचा पौराणिक संस्थापक किंवा अथेन्सचा प्रसिद्ध वक्ता ‘लायकरगस’ असू शकतो. दुसऱ्या पुतळ्याला लांब दाढी असून त्यावर कोणतेही नाव नाही. तो एखादा महान तत्त्वज्ञ किंवा विचारवंत असावा, असा अंदाज वर्तवला जात आहे. ‘इस्रायल अँटिक्विटीज ऑथॉरिटी'चे शास्त्रज्ञ मायकेल सोरोत्स्किन यांनी सांगितले, "सुरुवातीला मातीतून काहीतरी बाहेर आलेले दिसले; पण जेव्हा हळूहळू माती बाजूला केली, तेव्हा तो नेहमीचा मातीचा घडा नसून चक्क मौल्यवान संगमरवरी पुतळा असल्याचे पाहून आमचा विश्वासच बसला नाही."
पुतळे लपवण्याचे कारण काय?
हे पुतळे ज्या वाड्यामध्ये सापडले, तो रोमन प्रांताची राजधानी असलेल्या ऐतिहासिक 'सिझेरिया' शहरात राहणाऱ्या एखाद्या अत्यंत श्रीमंत व्यक्तीचा असावा. चौथ्या किंवा पाचव्या शतकात झालेल्या प्रादेशिक युद्धांमुळे किंवा चोरीच्या भीतीपोटी मालकाने हे मौल्यवान पुतळे दारूच्या हौदात तोंड खाली करून लपवून ठेवले असावेत, असा संशोधकांचा अंदाज आहे.