Sahara Desert : सहारा वाळवंटात सापडलेला गुलाबी दगड निघाला मंगळावरील

८०० ग्रॅम वजनाच्या पाषाणात आढळल्या पाण्याच्या खुणा
Sahara Desert
सहारा वाळवंटात सापडलेला गुलाबी दगड निघाला मंगळावरील
Published on: 
Updated on: 

वॉशिंग्टन : सहारा वाळवंटात २०२२ मध्ये सापडलेला सुमारे ८०० ग्रॅम वजनाचा गुलाबी रंगाचा दगड मंगळग्रहावरील असल्याचे निष्पन्न झाले आहे. नासाच्या मदतीने करण्यात आलेल्या संशोधनातून या वृत्ताची पुष्टी झाली आहे. तपासणीदरम्यान हा खडक ४.१ अब्ज वर्षांपेक्षाही जुना असल्याचे समोर आले आहे. यामध्ये असे खनिजे आढळले आहेत, जे दर्शवतात की मंगळाच्या सुरुवातीच्या काळात तिथल्या खडकांच्या संपर्कात पाणी आले होते.

ही शोधमोहीम मंगळाचे जुने वातावरण समजून घेण्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरू शकते. वैज्ञानिकांच्या मते, त्या काळी मंगळ आजच्यासारखा थंड आणि कोरडा नव्हता. या खडकाला ‘तेघाझा ००१’ (Teghaza 001) असे नाव देण्यात आले आहे. हा खडक माली येथील तेघाझा मिठाच्या मैदानावर सापडला होता. सुरुवातीला हा दगड नेमका कुठून आला आहे, याबाबत वैज्ञानिकांना कोणतीही माहिती नव्हती. या खडकाची ओळख पटवण्यासाठी वैज्ञानिकांनी त्यात असलेल्या ऑक्सिजनच्या आइसोटोप्सची (समस्थानिक) तपासणी केली. आइसोटोप्स म्हणजे एकाच मूलद्रव्याचे वेगवेगळे प्रकार होत. वेगवेगळ्या ग्रहांच्या खडकांमध्ये त्यांचे प्रमाण वेगवेगळे असू शकते. तपासणीत या दगडाचे आइसोटोप्स मंगळावरील खडकांशी जुळत असल्याचे निदर्शनास आले.

या वादानंतर वैज्ञानिकांनी त्याच्या रचनेची आणि खनिजांची तपासणी केली. यामध्ये ‘झिरकॉन’ (Zircon) नावाचे छोटे स्फटिक सापडले. या स्फटिकांच्या मदतीने वैज्ञानिकांनी खडकाचे वय निश्चित केले. खडकात सापडलेली खनिजे आणि त्यांची रचना यावरून मंगळावर कधीकाळी पाणी अस्तित्वात होते हे स्पष्ट होते. पाण्याच्या संपर्कात आल्यामुळे या खडकातील काही खनिजांमध्ये बदल झाला होता. ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे. कारण, याद्वारे वैज्ञानिक मंगळाचे सुरुवातीचे वातावरण कसे होते आणि तिथे पाण्याची उपस्थिती कशा स्वरूपात होती हे समजून घेऊ शकतात.

तसेच काळाच्या ओघात मंगळावरील पाणी कसे कमी झाले, हे जाणून घेण्यासही यामुळे मदत होऊ शकते. मात्र, पाण्याचे संकेत मिळाल्याचा अर्थ असा नाही की मंगळावर कधीकाळी जीवसृष्टीही अस्तित्वात होती. यासाठी अजून सखोल अभ्यासाची गरज आहे. वैज्ञानिकांनी मंगळाभोवती प्रदक्षिणा घालणाऱ्या ऑर्बिटरकडून मिळालेल्या आकडेवारीची तुलना या खडकातील खनिजे आणि रासायनिक रचनेशी केली. याच्या आधारे मंगळावरील अशा १३ ठिकाणांची ओळख पटवण्यात आली, जिथून हा खडक आला असावा. यातील अनेक ठिकाणे मंगळाच्या दक्षिण भागातील उच्च भूमी आणि खड्ड्यांच्या प्रदेशात आहेत. तथापि, त्याचे नेमके उगमस्थान अद्याप शोधले गेलेले नाही. वैज्ञानिकांच्या मते, मंगळाच्या पृष्ठभागावर एखाद्या मोठ्या अंतराळ पिंडाची धडक बसल्यामुळे तिथल्या खडकाचा एक तुकडा अंतराळात फेकला गेला असावा. दीर्घ प्रवासाचा टप्पा पार करत हा तुकडा पृथ्वीवर पोहोचला आणि सहारा वाळवंटात येऊन पडला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.