

कॅनबेरा : मंगळ आणि शुक्र ग्रहांवर संशोधन करणारे जग आजही विज्ञान आणि अंधश्रद्धा यांच्या दरम्यान अडकले आहे. विज्ञानाने चंद्राच्या पलीकडे झेप घेतली असली, तरी अंधश्रद्धेची मानसिकता अजूनही कायम आहे. या आठवड्यात घडलेल्या दोन घटनांमुळे प्रलयाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. खोल समुद्रात आढळणारी दुर्मीळ ओरफिश, जिला ‘प्रलय मासा’ (डूम्स डे फिश) म्हणून ओळखले जाते, ती भारताच्या तामिळनाडू आणि ऑस्ट्रेलियाच्या टास्मानियाच्या समुद्र किनार्यावर दिसली आहे. हे मासे समुद्रातून बाहेर येऊन किनार्यावर आले आहेत. प्राचीन दंतकथा आणि काही संस्कृतींचा असा विश्वास आहे की, ओरफिश नैसर्गिक आपत्तींची पूर्वसूचना देतात.
ओरफिशला जगातील सर्वात लांब हाडे असणारा मासा मानला जातो. त्याची लांबी 8 फुटांपेक्षा जास्त असू शकते आणि हे मासे सहसा समुद्राच्या 150 ते 1000 मीटर खोलीत आढळतात. ते क्वचितच पृष्ठभागावर दिसतात. त्यांची चांदीसारखी चमकदार त्वचा आणि लाल रंगाची पंखांसारखी रचना त्यांना अधिक रहस्यमय बनवते. या माशांना ‘राक्षसी मासे’ देखील म्हटले जाते. या माशांबद्दल जगाच्या अनेक भागांमध्ये वेगवेगळ्या कथा प्रचलित आहेत. अलीकडेच, भारताच्या तामिळनाडू आणि ऑस्ट्रेलियाच्या टास्मानियामध्ये दोन मोठे आणि दुर्मीळ ओरफिश समुद्र किनार्यावर वाहून आले.
या घटनांमुळे जगात अनेक ठिकाणी लोकांचे कुतूहल, भीती आणि चिंताही वाढली आहे. तामिळनाडूमध्ये मच्छीमारांनी या आठवड्याच्या सुरुवातीला पाण्यातून 30 फूट लांबीची एक मोठी ओरफिश बाहेर काढली. लाल शिक्का असलेला आणि चांदीसारखा चमकणारा हा मासा इतका मोठा होता की, त्याला हाताळण्यासाठी अर्धा डझन लोकांची गरज पडली. हा मासा भूकंप किंवा त्सुनामीच्या अशुभ भविष्यावाणीशी संबंधित आहे. यानंतर लवकरच, टास्मानियाच्या पश्चिम किनार्यावरील ओशन बीचवर आणखी एक ओरफिश दिसली.
जपानी संस्कृतीत ओरफिशला ‘Ryugu no tsukai' म्हटले जाते, ज्याचा अर्थ ‘समुद्राच्या देवाचा दूत’ असा होतो. असा समज आहे की, जेव्हा हे मासे पृष्ठभागावर येतात, तेव्हा ते एखाद्या मोठ्या नैसर्गिक आपत्तीचे, जसे की भूकंप किंवा त्सुनामी येण्याचे संकेत देतात. 2011 मध्ये जपानमध्ये आलेल्या विनाशकारी भूकंप आणि त्सुनामीपूर्वी अनेक ओरफिश समुद्र किनार्यावर दिसले होते, ज्यामुळे या समजुतीला आणखी बळ मिळाले. ओरफिश किनार्यावर येण्याबाबत अनेक अंधविश्वास प्रचलित असले, तरी वैज्ञानिकांचा असा विश्वास आहे की, या माशांचे पृष्ठभागावर येणे हे त्यांच्या आजारी किंवा जखमी असण्याचे लक्षण असू शकते. समुद्राच्या खोलीत राहणारे हे मासे जेव्हा काही कारणास्तव पृष्ठभागावर येतात, तेव्हा ते बहुतेक वेळा कमजोर किंवा मृत होतात.