Medicinal Plants : उत्तराखंडमध्ये १४० वर्षांनंतर आढळली दुर्मीळ वनौषधी

उत्तराखंडच्या पर्वतरांगांमध्ये सापडला निसर्गाचा मोठा ठेवा
Medicinal Plants
उत्तराखंडमध्ये १४० वर्षांनंतर आढळली दुर्मीळ वनौषधी
Published on
Updated on

डेहराडून : उत्तराखंडच्या हिमालयीन जंगलांमधून एक अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. सुमारे १४० वर्षांपूर्वी नोंदवलेली एक दुर्मीळ औषधी वनस्पती शास्त्रज्ञांनी पुन्हा शोधून काढली आहे. या शोधामुळे संपूर्ण वैज्ञानिक जगतात मोठ्या उत्साहाचे वातावरण आहे.

ही वनस्पती ‘स्वर्टिया डाइलेटाटा वैराइटी पिलोसा’ (Swertia dilatata var. pilosa) या नावाने ओळखली जाते. १८८३ सालानंतर ही वनस्पती जगात कुठेही पाहिली गेली नव्हती. उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यातील बद्रीनाथ वन विभागाच्या देवाल परिसरात या वनस्पतीचे अस्तित्व आढळून आले आहे. या महत्त्वपूर्ण शोधाची नोंद ‘ओरिक्स’ या आंतरराष्ट्रीय संशोधन पत्रिकेतदेखील घेण्यात आली आहे. या अभ्यासात ‘भारतीय वनस्पती सर्वेक्षण’ (BSI) च्या डेहराडून येथील उत्तर प्रादेशिक केंद्राचे शास्त्रज्ञ अंबर श्रीवास्तव आणि डॉ. सुशील कुमार सिंह यांच्यासह ‘हेमवती नंदन बहुगुणा गडवाल विद्यापीठा’चे शास्त्रज्ञ डॉ. सुनीत सिंह आणि प्रा. जे. पी. मेहता यांचा समावेश होता. १८८३ मध्ये नेपाळमधून मिळालेल्या नमुन्यांच्या आधारे या वनस्पतीचे पहिले वैज्ञानिक वर्णन तयार करण्यात आले होते. त्यानंतर जवळपास दीड शतक ही वनस्पती जगाला दिसली नाही; त्यामुळे ती नामशेष झाली असावी, असा अंदाज शास्त्रज्ञ लावत होते. परंतु, चमोली जिल्ह्यातील पूर्व पिंडार भागात सर्वेक्षण करत असताना देवालच्या सदाहरित जंगलात याचे काही नमुने सापडले. भारतातील या प्रकारची ही पहिलीच प्रमाणित नोंद मानली जात आहे.

शास्त्रज्ञांच्या मते, ‘स्वर्टिया’ प्रजातीच्या वनस्पतींना सामान्य भाषेत ‘चिरायता’ म्हटले जाते. आयुर्वेद आणि पारंपरिक वैद्यकीय पद्धतींमध्ये याचा वापर तापावर, पचनाच्या समस्यांवर, यकृत आजारांवर आणि मधुमेहावर केला जातो. प्रचंड औषधी मागणीमुळे या प्रजातीचे गेल्या अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणात शोषण झाले आहे, ज्यामुळे यातील अनेक प्रजाती धोक्यात आल्या आहेत. अशा वनस्पती पुन्हा मिळणे हे जैवविविधतेच्या संवर्धनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. कारण, यामुळे त्या प्रजातीला वाचवण्याची नवी आशा निर्माण होते. अत्यंत कमी संख्येमुळे शास्त्रज्ञ सध्या या वनस्पतीच्या संख्येचा, विस्ताराचा आणि वास्तविक स्थितीचा सविस्तर अभ्यास करत आहेत. या आधारे, भविष्यात ‘आययूसीएन’ (IUCN - Nature Conservation Union) च्या धोक्यात आलेल्या प्रजातींच्या (Endangered Species) यादीत याचा समावेश केला जाणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news