

नामिबिया : नामिबियामधील एकेकाळच्या हिऱ्यांच्या खाणकामासाठी प्रसिद्ध असलेल्या कोल्मान्स्कोप्प या सध्या ओसाड पडलेल्या शहरात एका दुर्मीळ तरसाचे जुन्या इमारतीसमोर छायाचित्र टिपण्यात आले. या छायाचित्राला प्रतिष्ठेचा ‘वाईल्डलाईफ फोटोग्राफर ऑफ द इयर 2025’ पुरस्कार जाहीर झाला आहे.
दक्षिण आफ्रिकेचे छायाचित्रकार विम व्हॅन डेन हीव्हर यांनी काढलेले हे छायाचित्र ‘घोस्ट टाऊन व्हिजिटर’ या नावाने ओळखले जात आहे. आयोजकांनी निवेदनानुसार, व्हॅन डेन हीव्हर यांनी कॅमेरा ट्रॅप तंत्रज्ञानाचा वापर करून हे छायाचित्र घेण्यासाठी तब्बल 10 वर्षे काम केले आहे. या स्पर्धेत एकूण 60,636 प्रवेशिका आल्या होत्या, त्यापैकी व्हॅन डेन हीव्हर यांचे छायाचित्र विजेते ठरले.
या छायाचित्रात दिसणारा तपकिरी तरस हा जगातील सर्वात दुर्मीळ तरस प्रजातींपैकी एक आहे. हा तरस प्रामुख्याने रात्री वावरणारा आणि एकटा राहणारा असल्यामुळे तो फारसा दिसत नाही. त्यामुळेच व्हॅन डेन हीव्हर यांनी त्या परिसरात त्यांच्या पावलांचे ठसे पाहून कॅमेरा ट्रॅपचा वापर करण्यास सुरुवात केली. ‘वाईल्डलाईफ फोटोग्राफर ऑफ द इयर’च्या ज्युरी प्रमुख कॅथी मोरान यांनी सांगितले की, हे छायाचित्र दाखवते की मानवांनी सोडून दिलेल्या शहरात वन्यजीवांनी कसे पुनर्जीवन मिळवले आहे.