

लंडन : ब्रिटिश लेखिका जे. के. रोलिंग यांना एकेकाळी दोन वेळेच्या जेवणाचीही भ्रांत होती. अशा काळातच त्यांनी अक्षरशः कॉफी टेबलवर बसून ‘हॅरी पॉटर’ नावाच्या काल्पनिक पात्राची आणि त्याच्या जादूच्या दुनियेची कादंबरी लिहिली. ‘हॅरी पॉटर अँड द फिलॉसॉफर्स स्टोन’ ही पहिली कादंबरी 1997 मध्ये प्रकाशित झाली आणि जगभरातील इंग्रजी वाचन करणार्या मुलांनी ती डोक्यावर घेतली. त्यानंतर ओळीने सहा कादंबर्या प्रसिद्ध झाल्या व त्यावर आधारित चित्रपटही बनले. तोपर्यंत रोलिंग या जगातील सर्वाधिक मानधन घेणार्या लेखिका बनल्या होत्या! आता त्यांच्या पहिल्या पुस्तकाच्या पहिल्यावहिल्या आवृत्तीमधील एका पुस्तकाला लिलावात तब्बल 22 लाख रुपयांची किंमत मिळाली आहे!
या पुस्तकाला काही दिवसांनंतर कचर्यात टाकले जाणार होते. मात्र, त्याचवेळी हे समजले की, हे पुस्तक ‘हॅरी पॉटर अँड द फिलॉसॉफर्स स्टोन’चे एक दुर्मीळ असे पहिले संस्करण आहे. त्यामुळे या पुस्तकाचा लिलाव करण्याचे ठरवण्यात आले. लिलावात त्याला 21 हजार पौंडापेक्षाही अधिक किंमत मिळाली. भारतीय चलनात ती 22,78,737 पेक्षाही अधिक आहे. पॅग्नटनमध्ये एनएलबी लिलावात अनेक लोकांनी स्वतः हजर राहून किंवा फोनवरून सहभाग घेतला होता. लिलाव करणार्या डॅनियल पीयर्स यांना हे पुस्तक ब्रिक्सहममधील एका मृत व्यक्तीच्या साहित्यात आढळले होते व ते कचर्यात टाकले जाणार होते. या पुस्तकाच्या पहिल्या पाचशे प्रिंटस् काढण्यात आल्या होत्या. सार्वजनिक ग्रंथालयांमध्ये वितरित केलेल्या 300 प्रतींपैकी हे एक होते. या पुस्तकामागे असलेल्या ‘फिलॉसॉफर्स’ शब्दाच्या स्पेलिंगमधील चूकच ते पहिल्या आवृत्तीमधील असल्याचा पुरावा होते!