Hainan hare sighting | तब्बल 40 वर्षांनंतर दिसला दुर्मीळ ‘हैनान ससा’

Hainan hare sighting |
Hainan hare sighting | तब्बल 40 वर्षांनंतर दिसला दुर्मीळ ‘हैनान ससा’
Published on
Updated on

बीजिंग : गेल्या चार दशकांपासून निसर्गप्रेमी आणि शास्त्रज्ञांना हुलकावणी देणारा, अत्यंत दुर्मीळ मानला जाणारा ‘हैनान ससा’ अखेर संशोधकांना दिसून आला आहे. मात्र, हा शोध एका दुर्दैवी घटनेतून लागला. रस्त्याच्या कडेला या प्राण्याचा मृतदेह अत्यंत चपट्या अवस्थेत आढळला.

दक्षिण चीनमधील हैनान बेटावर संशोधक आपल्या क्षेत्रीय कामासाठी जात असताना, त्यांना अचानक रस्त्यावर एक मृत प्राणी दिसला. तो मृतदेह अत्यंत खराब अवस्थेत असूनही, शास्त्रज्ञांनी त्याला तत्काळ ओळखले. हा प्राणी दुसरा तिसरा कोणी नसून जगातील सर्वात कमी अभ्यासल्या गेलेल्या ससा प्रजातींपैकी एक असलेला ‘हैनान ससा’ (Lepus hainanus) होता. ‘मॅमॅलिया’ या नियतकालिकात 15 डिसेंबर 2025 रोजी प्रसिद्ध झालेल्या अभ्यासानुसार, हा मृतदेह बेटाच्या ईशान्य भागात आढळला. विशेष म्हणजे, या भागात 1986 नंतर या प्रजातीची अधिकृत नोंद झालेली नव्हती.

सध्या हा ससा केवळ पश्चिम हैनानमधील ‘दतियान नॅशनल नेचर रिझर्व्ह’मध्येच शिल्लक असल्याचे मानले जात होते. मात्र, मूळ वास्तव्यापासून तब्बल 200 किलोमीटर दूर हा ससा आढळल्याने, ईशान्य भागातही त्यांची एखादी छोटी वस्ती अजूनही अस्तित्वात असावी, अशी आशा निर्माण झाली आहे. हाँगकाँगस्थित ‘काडुरी फार्म अँड बोटॅनिक गार्डन’चे संरक्षण अधिकारी आणि या अभ्यासाचे मुख्य लेखक मायकेल हुई यांनी सांगितले की, ‘या शोधामुळे या अतिधोकादायक प्रजातीचा विस्तार अपेक्षेपेक्षा जास्त असल्याचे समोर आले आहे, ही एक जमेची बाजू आहे. मात्र, पश्चिम भागातील त्यांचे सुरक्षित मानले जाणारे गडही आता तितके सुरक्षित राहिलेले नाहीत.’

1950 च्या दशकात या सश्यांची संख्या सुमारे 10,000 च्या आसपास होती. 1970 आणि 80 च्या दशकात अधिवास नष्ट होणे आणि मांस व कातड्यासाठी झालेल्या अतिशिकारीमुळे त्यांची संख्या झपाट्याने घटली. 2008 च्या एका अहवालानुसार, संपूर्ण बेटावर केवळ 250 ते 500 ससे शिल्लक असावेत, असा अंदाज आहे. वाढत्या धोक्यामुळे चीनच्या ‘रेड लिस्ट’मध्ये या प्रजातीचा समावेश ‘अतिधोकादायक’ श्रेणीत करण्यात आला आहे. संशोधकांच्या मते, ही घटना दुःखद असली, तरी या प्रजातीला वाचवण्यासाठी आणि त्यांच्या नवीन वस्त्यांचा शोध घेण्यासाठी हे एक महत्त्वाचे वळण ठरू शकते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news