

सामोआ : एकेकाळी पृथ्वीवरून पूर्णपणे नाहीसा झालेला ‘डोडो’ पक्षी सर्वांनाच माहीत आहे. आता त्याच डोडो पक्ष्याचा सर्वात जवळचा जिवंत नातेवाईक मानला जाणारा ‘मानुमिया’ हा पक्षी सामोआमध्ये अनेकदा दिसून आला आहे. या शोधामुळे हा अतिशय दुर्मीळ पक्षी अस्तित्वात असून, त्याला वाचवता येईल, अशी नवी आशा निर्माण झाली आहे.
‘सामोआ संवर्धन संस्थे’ने 17 ऑक्टोबर ते 13 नोव्हेंबर दरम्यान एक सर्वेक्षण केले. या मोहिमेत ‘मानुमिया’ (शास्त्रीय नाव : Didunculus strigirostris) या पक्ष्याचे पाच वेळा दर्शन झाले. विशेष म्हणजे, यापूर्वीच्या सर्वेक्षणांमध्ये हा पक्षी क्वचितच एकदा दिसायचा. या लाजाळू पक्षाचा जंगलातील शेवटचा फोटो 2013 मध्ये काढण्यात आला होता. 1990 च्या दशकाच्या सुरुवातीला केवळ सामोआमध्ये आढळणार्या या पक्ष्यांची संख्या सुमारे 7,000 होती. मात्र, जंगलतोड, शिकार आणि इतर घुसखोर प्राण्यांच्या हल्ल्यांमुळे 2024 पर्यंत त्यांची संख्या अंदाजे 50 ते 150 इतकीच उरली आहे. संवर्धन संस्थेच्या प्रकल्प समन्वयक मोउमु उईली यांनी सांगितले की, ‘आम्हाला भीती होती की हा पक्षी आता जिवंत असेल की नाही? जर आम्हाला तो आढळला नसता, तर मानुमिया कायमचा संपला, असे समजावे लागले असते.
‘पक्षी दिसला असला, तरी त्याचा फोटो काढण्यात पथकाला यश आले नाही. उईली यांच्या मते, ‘हा पक्षी अचानक समोर येतो. दुर्बिणीतून तो स्पष्ट दिसतो; पण कॅमेरा हातात घेईपर्यंत तो वेगाने उडून गायब होतो.’ पावसाळी वातावरण आणि पक्षाची चपळता यामुळे त्याचे छायाचित्र घेता आले नाही. मानुमिया हा त्याच्या वंशातील एकमेव जिवंत पक्षी आहे. जर हा पक्षी नामशेष झाला, तर त्याच्यासोबतच संपूर्ण प्रजाती नष्ट होईल. कोंबडीच्या आकाराच्या या पक्षाला वैज्ञानिक भाषेत ‘छोटा डोडो’ असेही म्हणतात. डोडो आणि मानुमिया हे दोन्ही बेटांवर जमिनीवर राहणार्या कबुतरांच्या प्रजातीतील मानले जातात.