

बंगळूर : आपण सर्वांनी आतापर्यंत ए, बी, एबी आणि ओ या रक्तगटांबद्दल ऐकले आहे. काही जणांना ‘बॉम्बे ब्लड ग्रुप’सारख्या दुर्मीळ रक्तगटाचीही माहिती असेल; पण कर्नाटकातील कोलार जिल्ह्यात एका महिलेच्या शरीरात असा रक्तगट सापडला आहे, जो इतका दुर्मीळ आहे की, त्याने वैद्यकीय तज्ज्ञांनाही चक्रावून सोडले आहे. ‘क्रिब अँटिजेन’ (CRIB antigen) असे नाव असलेल्या या रक्तगटाच्या शोधामुळे वैद्यकीय क्षेत्रात कुतूहल निर्माण झाले आहे; पण त्याचबरोबर त्या महिलेच्या आरोग्यासमोर एक मोठे आव्हान उभे राहिले आहे.
कोलार येथील एका महिलेच्या नियमित आरोग्य तपासणीदरम्यान डॉक्टरांना तिच्या रक्ताचे नमुने नेहमीपेक्षा वेगळे असल्याचे जाणवले. प्राथमिक चाचण्यांमध्ये तिचा रक्तगट निश्चित करता येत नव्हता. त्यामुळे अधिक सखोल आणि प्रगत चाचण्यांसाठी नमुने पाठवण्यात आले. या चाचण्यांमधून समोर आलेला निष्कर्ष धक्कादायक होता. या महिलेच्या लाल रक्तपेशींवर ‘क्रिब’ नावाचे अँटिजेन (एक प्रकारचे प्रथिन) अस्तित्वातच नाही. सामान्यतः, बहुतेक लोकांच्या रक्तपेशींवर हे अँटिजेन असते. ज्यांच्या रक्तात हे अँटिजेन नसते, त्यांचा रक्तगट ‘क्रिब निगेटिव्ह’ म्हणून ओळखला जातो, जो जगात अत्यंत दुर्मीळ मानला जातो.
हा शोध वैद्यकीयद़ृष्ट्या महत्त्वाचा असला, तरी संबंधित महिलेसाठी तो अत्यंत जोखमीचा आहे. तिला भविष्यात कधीही रक्ताची गरज भासल्यास, तिला केवळ ‘क्रिब निगेटिव्ह’ रक्तगटाच्या व्यक्तीचेच रक्त दिले जाऊ शकते. दुसरा कोणताही रक्तगट तिच्या शरीरात स्वीकारला जाणार नाही. जर तिला चुकून सामान्य रक्तगटाचे रक्त दिले गेले, तर गंभीर रिअॅक्शन होऊन तिचा जीव धोक्यात येऊ शकतो. जगात या रक्तगटाचे लोक हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच असल्याने, ऐनवेळी रक्तदाता मिळवणे जवळजवळ अशक्य आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी डॉक्टर आणि संशोधक काही उपायांवर विचार करत आहेत. या महिलेला स्वतःचे रक्त दान करून ते विशेष रक्तपेढीत साठवून ठेवण्याचा सल्ला दिला जात आहे, जेणेकरून आपत्कालीन परिस्थितीत ते तिलाच वापरता येईल.
या घटनेमुळे देशभरात दुर्मीळ रक्तगट असलेल्या लोकांची एक नोंदणी प्रणाली तयार करण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. महिलेच्या जवळच्या नातेवाईकांचीही रक्त तपासणी केली जात आहे. कारण, आनुवंशिकतेमुळे त्यांच्यातही हा दुर्मीळ रक्तगट असण्याची शक्यता आहे.