

झुरिच : स्वित्झर्लंडमधील एका दलदलीच्या भागात सर्वेक्षण करत असताना दोन स्वयंसेवक पुरातत्त्व शास्त्रज्ञांना सोन्याची दोन अत्यंत दुर्मीळ नाणी सापडली आहेत. ही नाणी देशातील आतापर्यंत सापडलेल्या सर्वात जुन्या ‘केल्टिक’ नाण्यांपैकी असावीत, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. विशेष म्हणजे, ही नाणी प्राचीन काळी देवांना नवस किंवा अर्पण म्हणून अर्पण केली असावीत, अशी शक्यता संशोधकांनी व्यक्त केली आहे.
ही दोन्ही सुवर्ण नाणी साधारण 2,300 वर्षांपूर्वीची (इसवी सन पूर्व तिसऱ्या शतकाच्या मध्यकाळातील) आहेत. स्वित्झर्लंडच्या पुरातत्त्व विभागाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘ही नाणी स्वित्झर्लंडमध्ये सापडलेल्या सर्वात जुन्या केल्टिक नाण्यांच्या अत्यंत लहान गटाचा भाग आहेत, ज्यांची संख्या आतापर्यंत केवळ 20 च्या वर आहे.’ सापडलेल्या नाण्यांपैकी पहिले नाणे 7.8 ग्रॅम वजनाचे आहे. तर दुसरे नाणे 1.86 ग्रॅम वजनाचे आहे. ‘स्टेटर’ हा शब्द प्राचीन ग्रीक नाण्यांपासून आला आहे. इसवी सन पूर्व चौथ्या शतकाच्या शेवटी, युरोपमधील ‘केल्टस’ जमातीचे लोक भाडोत्री सैनिक म्हणून काम करत असताना त्यांना मोबदला म्हणून ग्रीक नाणी दिली जात असत. याच ग्रीक नाण्यांपासून प्रेरणा घेऊन त्यांनी तिसऱ्या शतकाच्या सुरुवातीला
स्वतःची नाणी तयार करण्यास सुरुवात केली. ही नाणी मॅसेडोनचा राजा फिलिप दुसरा (अलेक्झांडर द ग्रेटचे वडील) यांच्या काळातील सोन्याच्या नाण्यांची नक्कल करून बनवण्यात आली आहेत. नाण्याच्या पुढच्या बाजूला ग्रीक देव अपोलोची प्रतिमा आहे, तर मागच्या बाजूला दोन घोड्यांचा रथ दाखवण्यात आला आहे. मात्र, केल्टिक लोकांनी यात काही बदल केले होते. लहान नाण्याच्या मागच्या बाजूला घोड्यांच्या खाली ‘ट्रिपल स्पायरल’ हे चिन्ह दिसते, जे केल्टिक कलेचे वैशिष्ट्य मानले जाते. 2022 ते 2023 दरम्यान ‘आर्किऑलॉजी बेसलँड’ च्या स्वयंसेवकांना आरिसडॉर्फजवळील ‘बेरेनफेल्स’ दलदलीच्या भागात केल्टिक काळातील 34 चांदीची नाणी सापडली होती. याच आधारावर व्होल्फगांग निडरबर्गर आणि डॅनियल मोना या दोन स्वयंसेवकांनी 2025 च्या वसंत ऋतूत पुन्हा तपासणी केली असता त्यांना ही सोन्याची नाणी सापडली.