Dronagiri Mountain | ‘या’ गावाजवळ आहे रामायणकालीन द्रोणागिरी पर्वत

गावातील या परंपरेची मुळे थेट रामायण काळात रुजलेली
ramayan-era-dronagiri-mountain-near-this-village
Dronagiri Mountain | ‘या’ गावाजवळ आहे रामायणकालीन द्रोणागिरी पर्वतPudhari File Photo
Published on
Updated on

चमोली (उत्तराखंड) : भारत हा श्रद्धा आणि परंपरांचा देश आहे. विशेषतः, संकटमोचक हनुमानाची पूजा तर संपूर्ण देशात मोठ्या भक्तिभावाने केली जाते; पण याच भारतात एक असे गाव आहे, जिथे हनुमानाचे नाव घेणे किंवा त्यांची पूजा करणे हा चक्क गुन्हा मानला जातो. हिमालयाच्या कुशीत, उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यात वसलेल्या ‘नीती’ या गावात ही अनोखी आणि तितकीच आश्चर्यकारक परंपरा आजही जपली जात आहे. या नीती गावाजवळच त्यांचा आराध्य असा द्रोणागिरी पर्वत आहे.

गावातील या परंपरेची मुळे थेट रामायण काळात रुजलेली आहेत. पौराणिक कथेनुसार, जेव्हा रावणपुत्र मेघनादाच्या शक्ती बाणामुळे लक्ष्मण मूर्च्छित झाले, तेव्हा त्यांचे प्राण वाचवण्यासाठी वैद्य सुषेण यांनी हिमालयातील द्रोणागिरी पर्वतावर मिळणारी संजीवनी बुटी आणण्यास सांगितले. हे कार्य करण्यासाठी हनुमान द्रोणागिरी पर्वतावर पोहोचले. मात्र, त्यांना संजीवनी बुटी नेमकी कोणती, हे ओळखता आले नाही. वेळेचे महत्त्व ओळखून त्यांनी पर्वताचा एक मोठा भागच उचलून लंकेकडे नेला.

येथील ग्रामस्थांसाठी द्रोणागिरी पर्वत हा केवळ दगड-मातीचा डोंगर नाही, तर तो त्यांचा आराध्य देव आहे. ते या पर्वताची पूजा करतात. त्यांच्या श्रद्धेनुसार, हनुमानाने संजीवनीसाठी पर्वताचा भाग उचलून नेल्याने त्यांच्या देवतेला इजा पोहोचली. हनुमानाच्या या कृतीमुळे ग्रामस्थ आजही त्यांच्यावर नाराज आहेत. याच कारणामुळे या गावात हनुमानाची पूजा केली जात नाही किंवा त्यांचे नावही घेतले जात नाही. गावात हनुमानाचे प्रतीक मानला जाणारा लाल ध्वज लावण्यासही मनाई आहे.

पिढ्यान्पिढ्या ही श्रद्धा आणि परंपरा येथील लोक निष्ठेने जपत आले आहेत. जोशीमठपासून सुमारे 50 किलोमीटर अंतरावर, धौलीगंगा नदीच्या काठावर हे गाव वसलेले आहे. समुद्रसपाटीपासून सुमारे 14,000 फूट उंचीवर असलेल्या या गावात पोहोचण्यासाठी आजही खडतर प्रवास करावा लागतो. येथील निसर्गसौंदर्य डोळ्यांचे पारणे फेडणारे आहे. उंचच उंच बर्फाच्छादित शिखरे, घनदाट जंगल आणि शांत वातावरण, यामुळे हे ठिकाण गिर्यारोहक आणि निसर्गप्रेमींसाठी एक पर्वणीच आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news