

नवी दिल्ली : त्रेतायुगातील विष्णुस्वरूप असे अयोध्येचे राजाधिराज भगवान श्रीराम यांचे समकालिन महर्षी वाल्मिकी यांनी लिहिलेला पहिला अधिकृत श्रीरामचरित्र ग्रंथ म्हणजे ‘वाल्मिकी रामायण’. स्वतः वाल्मिकी ॠषींनी श्रीरामाचे अलौकिक जीवन पाहिले होते व श्रीरामाचे जुळे पुत्र लव आणि कुश यांचा जन्मही वाल्मिकींच्या तमसा नदीकाठी असलेल्या आश्रमातच झाला होता. अशा समकालिन व्यक्तीने लिहिलेल्या रामचरित्रात म्हणजेच रामायणात श्रीरामाने लंकेचा राजा रावणावर मिळवलेल्या भव्यदिव्य विजयाचेही समग्र वर्णन आढळते. भारताच्या मुख्य भूमीतून समुद्र ओलांडून लंकेत जाण्यासाठी श्रीरामाने वानरसेनेच्या मदतीने बांधलेला पूल म्हणजे रामसेतू. हा सेतू आजही त्या रामविजयाची आठवण करून देत अस्तित्वात आहेत. विजयादशमी म्हणजेच दसरा हा सण याच रामविजयासाठी साजरा केला जातो.
रामसेतू ही भारत आणि श्रीलंका या दोन देशांना जोडणारी उथळ खडकांची (लाइमस्टोन शोल्स) नैसर्गिक साखळी आहे. ती भारतातील पंबन बेट (रामेश्वरम) या बेटावरील धनुषकोडी आणि श्रीलंकेच्या वायव्य किनार्यावरील मन्नार बेट याला जोडते. या पुलाची एकूण लांबी सुमारे 48 ते 50 किलोमीटर आहे. या भागातील समुद्राची खोली खूपच उथळ आहे, जी साधारणपणे 3 फूट ते 30 फुटांदरम्यान आहे. त्यामुळे जहाजांना इथून ये-जा करणे शक्य नाही, त्यांना श्रीलंकेला वळसा घालून जावे लागते. याला नल सेतू किंवा सेतू बांध असेही म्हणतात. पाश्चात्त्य देशांमध्ये याला अॅडम्स ब्रिज किंवा आदम पूल असे म्हटले जाते.
रामसेतू मन्नारचे आखात आणि पाल्कची सामुद्रधुनी यांना वेगळे करतो. भूवैज्ञानिक आणि सागरी अभ्यासांनुसार, या रचना सुमारे 7,000 वर्षांपूर्वीच्या असल्याचे मानले जाते. काही अहवालानुसार, येथील खडक 7,000 वर्षांपूर्वीचे असून ज्या वाळूवर ते टिकले आहेत, ती 4,000 वर्षांपूर्वीची आहे, जी मानवी हस्तक्षेपाकडे निर्देश करते. काही अहवालानुसार आणि मंदिरातील नोंदींनुसार, 15 व्या शतकापर्यंत हा पूल पायदळ पार करण्यायोग्य होता; परंतु 1480 मध्ये आलेल्या एका चक्रीवादळामुळे तो अंशतः समुद्रात बुडाला आणि खोल झाला.
ही रचना नैसर्गिकरित्या तयार झालेली चुना-खडकांची साखळी आहे की, मानवाने बनवलेला पूल आहे, यावर वैज्ञानिक आणि धार्मिक स्तरावर अनेक दशकांपासून वाद आणि संशोधन सुरू आहे. रामायणानुसार, भगवान श्रीरामांनी त्यांची पत्नी सीता हिला लंकेचा राजा रावणाच्या तावडीतून सोडवण्यासाठी वानरसेनेच्या मदतीने हा पूल बांधला होता. वानरसेनेतील नल आणि नील या दोन अभियंत्यांच्या देखरेखीखाली हा पूल बांधला गेला. वाल्मिकी रामायणानुसार हा पूल अंदाजे पाच दिवसांत बांधला गेला. रामायणानुसार पुलाची लांबी 100 योजन आणि रुंदी 10 योजन होती. (एक योजन म्हणजे साधारणतः 13 ते 14 किलोमीटर).