

नवी दिल्ली : मध्य प्रदेशातील इंदूर विभागातील लोहमार्ग पोलिस रेल्वेरूळांना लागून असलेल्या झोपडपट्ट्यांमध्ये, हेच अधिकारी आता एका वेगळ्या भूमिकेत दिसत आहेत; जी कोणत्याही नियमावलीत लिहिलेली नाही: ती म्हणजे शिक्षक, समुपदेशक आणि शांतताप्रिय सुधारकांची भूमिका. त्यांचा ‘पटरी की पाठशाला’ (रुळांवरील शाळा) हा उपक्रम पोलिस अधीक्षक पद्म विलोचन शुक्ला यांची संकल्पना आहे. त्यांच्यासाठी या असामान्य मोहिमेची मुळे पोलिस मॅन्युअलमध्ये नसून 30 वर्षांपूर्वीच्या एका आठवणीत आहेत.
1993 मध्ये जेव्हा जॉन मेजर झोपडपट्टी सुधार प्रकल्प पाहण्यासाठी इंदूरला आले होते, तेव्हा मी स्पर्धा परीक्षेची तयारी करत होतो, ‘त्यांना झोपडपट्टीत जाताना आणि गरिबांसाठी राबवल्या जाणार्या योजना किती गांभीर्याने आखल्या आहेत, हे पाहून माझ्या मनावर मोठा परिणाम झाला. मी तेव्हाच स्वतःशी ठरवले होते की, एक दिवस मी झोपडपट्टीतील लोकांसाठी काम करेन. ऑक्टोबर 2025 मध्ये जीआरपी अधीक्षक म्हणून रुजू झाल्यानंतर मला ती संधी मिळाली, अशी आठवण शुक्ला यांनी सांगितली.
स्थानकांजवळील किरकोळ चोर्यांमध्ये स्थानिक मुलांचा (काही तर अवघ्या सात वर्षांची मुले) सहभाग वारंवार दिसून येत होता. रेल्वे रुळांच्या कोपर्यात किशोरवयीन मुलांचे गट अमली पदार्थांचे सेवन करताना आढळले. त्यातून त्यांनी ‘पटरी की पाठशाला’ ही अपारंपरिक शाळा सुरू केली. येथे वर्ग किंवा फळे नाहीत. त्याऐवजी, जीआरपी कर्मचार्यांची पथके विशेषतः महिला कॉन्स्टेबल नियमितपणे झोपडपट्ट्यांमध्ये जातात, कुटुंबांशी चर्चा करतात आणि मुलांशी सुरक्षा, सन्मान आणि चांगल्या निवडींविषयी बोलतात त्यातून सुमारे 40 विद्यार्थी पुन्हा नियमित शिक्षण घेऊ लागले आहेत आणि गुन्हेगारीपासून दूर झाले.