Spain Queen Mary | ‘या’ राणीमध्ये होती गर्भवती झाल्याची खोटी लक्षणे

 Spain Queen Mary |
Spain Queen Mary | ‘या’ राणीमध्ये होती गर्भवती झाल्याची खोटी लक्षणे
Published on: 
Updated on: 

माद्रिद : इतिहासामध्ये गरोदरपणाशी संबंधित अशा अनेक घटनांची नोंद आहे, ज्या ऐकून आजही विश्वास बसणे कठीण जाते. अशीच एक थक्क करणारी घटना १६ व्या शतकात स्पेनचे राजे फिलिप द्वितीय यांची पत्नी राणी मेरी प्रथम यांच्याबाबत घडली होती. आई होण्यासाठी राणी अत्यंत उत्सुक होत्या. त्यांना गरोदरपणाची सर्व लक्षणे जाणवत होती; पोट वाढले होते, मळमळ होत होती आणि गर्भात बाळाची हालचालही जाणवत होती. मात्र, काही महिन्यांतच त्यांच्या या अवस्थेमागील एक विचित्र आणि धक्कादायक सत्य समोर आले, ज्याने ही घटना वैद्यकीय इतिहासात नोंदवली गेली.

‘नॅशनल जिओग्राफिक’च्या अहवालानुसार, एप्रिल १५५५ मध्ये राणी मेरी प्रथम, ज्यांना इतिहासात ‘ब्लडी मेरी’ म्हणूनही ओळखले जाते, आपल्या पहिल्या अपत्याच्या जन्माची वाट पाहत होत्या. विवाहाच्या एका वर्षानंतर त्यांना आपण गरोदर असल्याची खात्री पटली. त्यांचे पोट वाढले, सकाळच्या वेळी मळमळ सुरू झाली आणि स्वतः राणीच्या म्हणण्यानुसार त्यांना पोटात बाळाची हालचालही स्पष्ट जाणवत होती. राजवाड्यात नव्या पाहुण्याच्या स्वागतासाठी जय्यत तयारी सुरू झाली. स्वतंत्र खोली सजवली गेली, अनुभवी सुईणींना पाचारण करण्यात आले. बाळाच्या जन्माची घोषणा करणारी अधिकृत राजपत्रेही तयार करून ठेवली गेली; फक्त त्यात जन्माची तारीख आणि मुलगा की मुलगी एवढीच माहिती भरणे बाकी होते.

‘मेरी ट्युडर : प्रिन्सेस, बास्टर्ड, क्वीन’ या पुस्तकाच्या लेखिका ॲना व्हिटलॉक यांच्या नोंदीनुसार, जसे जसे आठवडे उलटत गेले, तसतशी राजवाड्यातील निराशा आणि चिंता वाढू लागली. राणीचा मृत्यू झाला आहे किंवा बाळ दगावले असून त्याच्या जागी दुसऱ्या बाळाला आणले जाईल, अशा अनेक अफवाही पसरू लागल्या. मात्र, वास्तव अत्यंत धक्कादायक होते. राणी मेरी या प्रत्यक्षात गरोदर नव्हत्याच. त्यांच्या शरीरावर गरोदरपणाची सर्व बाह्य लक्षणे स्पष्ट दिसत असली, तरी त्या ‘स्युडोसिएसिस’ (Pseudocyesis) नावाच्या एका अत्यंत दुर्मिळ वैद्यकीय स्थितीचा बळी ठरल्या होत्या.

इतिहासात अत्यंत सविस्तरपणे नोंदवले गेलेले हे अशा प्रकारचे पहिलेच वैद्यकीय प्रकरण मानले जाते. ‘क्लीव्हलँड क्लिनिक’नुसार, ‘स्युडोसिएसिस’ किंवा ‘फॉल्स प्रेग्नन्सी’ (खोटे गरोदरपण) ही अशी मानसिक व शारीरिक अवस्था असते, ज्यामध्ये स्त्रीला स्वतः गरोदर असल्याची तीव्र जाणीव होते, मात्र प्रत्यक्षात ती गरोदर नसते. याला वैद्यकीय भाषेत ‘फँटम प्रेग्नन्सी’ (Phantom Pregnancy) असेही म्हणतात. या स्थितीमध्ये शरीरात गरोदरपणाची सर्व लक्षणे निर्माण होतात; परंतु गर्भाशयात कोणताही गर्भ वाढत नसतो. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, बाळ जन्माला घालण्याची अतीव इच्छा, तीव्र मानसिक दडपण, भावनिक ताण आणि शरीरातील हार्मोन्सचे अचानक बदललेले संतुलन या दुर्मीळ स्थितीमागील प्रमुख कारणे ठरतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news