
बीजिंग : अंधार्या चित्रपटगृहातून बाहेर प्रखर उन्हात आल्यावर आपले डोळे काही क्षणांसाठी कसे दिपून जातात, हे आपण सर्वांनी अनुभवले आहे. प्रकाशातील या बदलाशी जुळवून घ्यायला आपल्या डोळ्यांना थोडा वेळ लागतो. पण, आता शास्त्रज्ञांनी एक असे तंत्रज्ञान विकसित केले आहे, जे मानवी डोळ्यांपेक्षा पाचपट अधिक वेगाने काम करते. चीनच्या फुझोउ विद्यापीठातील संशोधकांनी एक असा ‘मशिन व्हिजन सेन्सर’ तयार केला आहे, जो रोबो आणि स्वयंचलित गाड्यांना क्षणार्धात अंधारातून प्रकाशात आणि प्रकाशातून अंधारात स्पष्टपणे पाहण्यास सक्षम करतो. हे क्रांतिकारी तंत्रज्ञान रोबोटिक्स आणि ऑटोमेशनच्या जगात मोठे बदल घडवण्याची क्षमता ठेवते.
या अद्भुत सेन्सरच्या निर्मितीमागे ‘क्वांटम डॉटस्’ या अतिसूक्ष्म कणांचे तंत्रज्ञान आहे. हे कण प्रकाश-संवेदनशील असून, ते सभोवतालच्या प्रकाशानुसार विद्युत चार्ज शोषून घेतात किंवा बाहेर टाकतात. संशोधकांनी या क्वांटम डॉटस्ना पॉलिमर आणि झिंक ऑक्साईडच्या थरांनी जोडून एक असा सेन्सर बनवला आहे, जो मानवी डोळ्यांच्या कार्यपद्धतीची नक्कल करतो. या सेन्सरचे वैशिष्ट्य केवळ त्याचा वेग नाही, तर त्याची ऊर्जा वाचवण्याची क्षमताही आहे. सध्याचे कॅमेरे किंवा सेन्सर समोर दिसणार्या प्रत्येक गोष्टीची माहिती संगणकाकडे पाठवतात, ज्यामुळे भरपूर ऊर्जा खर्च होते आणि प्रक्रिया मंदावते.
याउलट, हा नवीन सेन्सर मानवी डोळ्यांप्रमाणेच काम करतो. तो अनावश्यक माहिती (Noise) बाजूला सारून केवळ महत्त्वाच्या द़ृश्यांवर लक्ष केंद्रित करतो. यामुळे ऊर्जेची मोठी बचत होते आणि रोबो किंवा गाड्या अधिक वेगाने निर्णय घेऊ शकतात. या तंत्रज्ञानामुळे भविष्यात अनेक गोष्टी शक्य होतील. स्वयंचलित गाड्या : बोगद्यातून वेगाने बाहेर पडून प्रखर सूर्यप्रकाशात आल्यावरही या गाड्यांचा सेन्सर गोंधळणार नाही आणि अपघात टळतील.
रोबोटिक्स : वेअरहाऊस किंवा कारखान्यांमधील रोबो कमी प्रकाशात किंवा अचानक बदलणार्या प्रकाशातही तितक्याच अचूकतेने काम करू शकतील. फुझोउ विद्यापीठातील संशोधक आता हे तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणावर विकसित करण्याच्या तयारीत आहेत. यामध्ये मोठे सेन्सर आणि ‘एज-एआय’ चिप्सचा वापर करून माहितीवर थेट सेन्सरमध्येच प्रक्रिया केली जाईल, ज्यामुळे ते अधिक स्मार्ट आणि वेगवान बनेल. हे तंत्रज्ञान भविष्यात रोबोटिक्स आणि ऑटोमेशनच्या जगात क्रांती घडवण्याची प्रचंड क्षमता ठेवते, हे निश्चित.