

नवी दिल्ली : "Why Vladimir Putin Does Not Move His Right Hand' हा गुगलवर वारंवार सर्च होणारा प्रश्न आहे. यावरूनच रशियन राष्ट्राध्यक्षांची चाल किती चर्चेत आहे, याचा अंदाज बांधता येईल. मात्र खरोखरच पुतीन असं एक हात न हलवता का चालतात, माहितीये का? यामागील खरं कारण जाणून घेऊयात...
व्लादिमीर पुतीन चालताना त्यांचा उजवा हात हलवत नाहीत. त्यांचा चालताना कोणताही व्हिडीओ पाहिला, तरी त्यांच्या देहबोलीमधील हा उजवा हात न हलवण्याचा वेगळेपणा लगेच नजरेत भरतो. मात्र ते असं का करतात माहितीये का? खरं तर ज्या पद्धतीने पुतिन चालतात, ती एक विशिष्ट प्रकारची चालण्याची शैली आहे. या शैलीला ‘गन्सलिंगर गेट’ असं म्हणतात. आता पुतिन अशा पद्धतीने का चालतात, याबद्दलच्या कारणासंदर्भात बोलायचं झालं, तर यामागील मुख्य कारण केजीबी ही संस्था आहे. केजीबी ही रशियाची गुप्तचर संघटना आहे. पुतीन यांनी राजकारणात सक्रिय होण्यापूर्वी केजीबीमध्ये काम केलं आहे. ते गुप्तचर यंत्रणेसाठी काम करायचे. त्यावेळी त्यांना संस्थेत दाखल करून घेताना केजीबी प्रशिक्षण देण्यात आलं होतं.
केजीबीच्या प्रशिक्षणात एजंटांना शस्त्र काढण्यासाठी उजवा हात नेहमी तयार ठेवण्याचं प्रशिक्षण दिलं जातं. ज्यामुळे चालताना तो हात स्थिर राहतो आणि डावा हात सामान्यपणे हलतो. अनेकदा केजीबीच्या परेडमध्ये उजव्या हातात सरळ खांद्यापर्यंत उभी बंदूक धरलेली असते. म्हणून तो हात स्थिर ठेवून डावा हात चालवत परेड केली जाते. यातूनच पुतीन यांची ही स्टाईल तयार झाल्याचं सांगितलं जातं. 2015 मध्ये ‘ब्रिटिश मेडिकल जर्नल’मध्ये (बीएमजे) प्रकाशित झालेल्या अभ्यासात पुतिनसह दिमित्री मेदवेदेव, अनातोली सेरद्युकोव यासारख्या इतर रशियन अधिकार्यांच्या चालण्याच्या शैलीचे विश्लेषण करण्यात आले.
यूट्यूब व्हिडीओ आणि केजीबीच्या प्रशिक्षण मॅन्युअलचा अभ्यास करून संशोधकांनी निष्कर्ष काढला की, पुतिन यांचं हे असं उजवा हात सरळ ठेवून चालणं म्हणजे एक शिकणीमधून आत्मसात केलेलं वर्तन आहे. संशोधकांनी याचा थेट संबंध सैन्य किंवा गुप्तचर प्रशिक्षणाशी जोडला आहे. केजीबी मॅन्युअलमध्ये स्पष्टपणे सांगितले आहे की, चालताना उजवा हात छातीजवळ ठेवावा, जेणेकरून गरज पडल्यास त्वरित शस्त्र काढता येईल.
यामधूनच पुतीन यांची ही चालण्याची शैली निर्माण झाल्याचं सांगितलं जातं. अभ्यासात असे दिसून आले की, पुतिन यांच्या अशा वेगळ्या चालीचा इतर न्यूरोलॉजिकल समस्यांशी काहीच संबंध नाही. पार्किन्सन्स रोगातील कंप किंवा स्थिरतेचा या चालीशी काही संबंध असल्याचं दिसत नाही. पुतीन जूडो, पोहणे यासारख्या गोष्टी सहज करतात. यामधूनच त्यांना कोणतीही वैद्यकीय समस्या नसल्याचं सूचित करते. काही तज्ज्ञांनी पुतीन यांच्या या चालीचा पार्किन्सन्स किंवा खांद्याच्या दुखापतीशी संबंध जोडला आहे. पण अभ्यासात हे कारण नाकारण्यात आले आहे. हे कारण फेटाळून लावण्याचं मुख्य तर्क म्हणजे पुतीन यांचं हे असं चालणं वर्षानुवर्षे स्थिर आहे आणि त्याचा कोणत्याही व्याधीशी संबंध जोडता येणार नाही.