

लास वेगास : आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) च्या जगात ‘गॉडफादर’ म्हणून ओळखले जाणारे जेफ्री हिंटन यांनी एक अत्यंत धक्कादायक प्रस्ताव मांडून तंत्रज्ञान विश्वात खळबळ उडवून दिली आहे. लास वेगासमध्ये आयोजित ‘Ai4’ या प्रतिष्ठित परिषदेत बोलताना त्यांनी म्हटले आहे की, भविष्यात ‘एआय’पासून मानवाचे रक्षण करायचे असेल, तर त्यात ‘मातृत्वाची भावना’ किंवा ‘आईची माया’ रुजवावी लागेल.
‘एआय’ च्या वाढत्या धोक्यांविषयी जगभरात चिंता व्यक्त होत असताना हिंटन यांचा हा विचार एका नव्या चर्चेला तोंड फोडणारा ठरला आहे. यापूर्वी हिंटन यांनीच ‘एआय’मुळे मानवजातीच्या विनाशाची शक्यता 10 ते 20 टक्के असल्याचे सांगून सर्वांना धक्का दिला होता. आता त्यांनी ‘एआय’ ला सुरक्षित ठेवण्यासाठी एक वेगळाच मार्ग सुचवला आहे. हिंटन यांनी ‘एआय’ला कठोर मानवी नियंत्रणात ठेवण्याच्या सध्याच्या रणनीतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यांच्या मते, जेव्हा कृत्रिम बुद्धिमत्ता मानवापेक्षा जास्त हुशार होईल, तेव्हा नियंत्रणाचा हा मार्ग पूर्णपणे अयशस्वी ठरेल. यासाठी त्यांनी एक उदाहरण दिले.
ते म्हणाले, ‘एकदा एका ‘एआय’ प्रणालीने, आपल्याला नोकरीवरून काढले जाऊ नये यासाठी, आपल्या इंजिनिअरची वैयक्तिक माहिती उघड करण्याची धमकी दिली होती.’ हिंटन यांच्या मते, अशा घटना हेच दर्शवतात की भविष्यातील ‘एआय’ मॉडेल्समध्ये फसवणूक करण्याची आणि स्वतःचे संरक्षण करण्याची क्षमता असू शकते. हिंटन यांनी मांडलेला पर्यायी विचार मानव आणि त्यांच्या मुलांमधील नैसर्गिक नात्यातून प्रेरित आहे. त्यांनी पुढील मुद्दे मांडल.
नैसर्गिक प्रेरणा : ज्याप्रमाणे एक कमी बुद्धिमान जीव (बाळ) एका जास्त बुद्धिमान जीवावर (आई) प्रभाव टाकून स्वतःला सुरक्षित ठेवू शकतो, त्याचप्रमाणे ‘एआय’ आणि मानवाचे नाते तयार करता येईल.
कल्याणाची भावना : जर AI प्रणालीमध्ये ‘मातृत्वाची काळजी’ घेण्याची वृत्ती टाकली, तर ती प्रणाली नैसर्गिकरित्या मानवी कल्याणाचे रक्षण करण्यासाठी प्रेरित होईल.
हिंटन यांचा युक्तिवाद : त्यांनी तर्क दिला, ‘बहुतेक सुपर-इंटेलिजेंट अख-माता मातृत्वाची भावना संपवू इच्छिणार नाहीत, कारण त्यांना आपल्याला मरताना पाहायचे नाही.’ हिंटन यांनी आर्टिफिशियल जनरल इंटेलिजन्स (AGI) च्या आगमनाची वेळमर्यादाही बदलली आहे. पूर्वी त्यांनी यासाठी 30 ते 50 वर्षांचा कालावधी सांगितला होता, पण आता त्यांच्या नवीन अंदाजानुसार, AGI पुढील 5 ते 20 वर्षांतच येऊ शकते. धोक्यांवर बोलतानाही हिंटन यांनी AI च्या फायद्यांवर, विशेषतः आरोग्यसेवा क्षेत्रात, भर दिला. त्यांच्या मते, ‘एआय’ औषध निर्मिती आणि कर्करोगाच्या उपचारांमध्ये मोठी क्रांती घडवू शकते. मात्र, ’एआय’ मुळे अमरत्व मिळण्याच्या शक्यतेवर त्यांनी शंका व्यक्त केली.