लंडन : ग्रीसमधील एका प्राचीन मकबर्यात जांभळ्या रंगाच्या ‘ट्युनिक’ या वस्त्राचे अवशेष सापडले होते. हे वस्त्र एकेकाळी अलेक्झांडर द ग्रेट म्हणजेच जगज्जेता सिकंदरला परिधान केलेले वस्त्र असावे, असा दावा काही संशोधकांनी नव्या संशोधनानंतर केला आहे. अर्थातच या दाव्याशी अनेक लोक सहमत नाहीत. हा मकबरा अलेक्झांडरचा पिता ‘फिलिप-2’ याचा असावा, असे दीर्घकाळ मानले जात होते. मात्र आता हे थडगे अलेक्झांडरचा सावत्र भाऊ ‘फिलीप-3’चे असावे, असे म्हटले जात आहे.
अलेक्झांडरच्याच शाही कुटुंबातील व्यक्तींच्या दोन थडग्यांसमोरच हे थडगे आहे. नव्या संशोधनानुसार, हा मकबरा किंवा थडगे अलेक्झांडरच्या वडिलांचे नसून ते अलेक्झांडरचा सावत्र भाऊ फिलिप-3 किंवा अर्हीडस याचे असावे. या थडग्यात एक सुती वस्त्र आढळले आहे. हे वस्त्र अलेक्झांडरच्या निधनानंतर त्याला घातलेलेच वस्त्र असावे, असाही संशोधकांचा दावा आहे. त्यानंतर हे वस्त्र अर्हीडसकडे आले व त्यालाही याच वस्त्रानिशी दफन करण्यात आले. डेमोक्रिटस युनिव्हर्सिटी ऑफ थ्रेस येथील फिजिकल अँथ्राेपोलॉजी अँड पॅलिओंथ्राेपोलॉजीचे प्राध्यापक अँटोनिस बार्टसिओकास यांनी याबाबतचे संशोधन केले आहे. त्यांनी सांगितले की, हे ट्युनिक पवित्र मानले जात होते व केवळ अलेक्झांडरलाच ते घालण्याची परवानगी देण्यात आली होती. हे ट्युनिक तीन स्तरांचे असून ते जांभळ्या रंगाचे आहे. दोन सुती स्तरांमध्ये ह्युंटाईट नावाच्या खनिजाचा लवचिक स्तर आहे. प्राचीन काळी जांभळा हा शाही रंग मानला जात असे. याबाबतच्या संशोधनाची माहिती ‘जर्नल ऑफ फिल्ड आर्किओलॉजी’ मध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे. अर्थात या दाव्याला अनेक संशोधकांनी असहमती दर्शवलेली आहे. सध्याच्या ग्रीसमध्ये एकेकाळी मेसेडोनिया राज्य होते व त्याची राजधानी असलेल्या व्हर्जिना शहराजवळ हे थडगे आहे. त्यामध्ये सोन्याच्या पेटीत हे वस्त्र होते. अलेक्झांडरच्या काळात काही समकालीन लोक त्याला देवाचा अवतार समजत असत. काही संशोधकांच्या मते हे अलेक्झांडरचे वस्त्र तर नाहीच; शिवाय ते ट्युनिकही नाही. या थडग्यात दोन व्यक्तींचे सांगाडे आहेत. त्यापैकी एक अर्हीडासचा असून दुसरा त्याची पत्नी युरीडीसचा असल्याचे बार्टसिओकास यांचे म्हणणे आहे. अलेक्झांडरच्या इसवी सनपूर्व 323 मधील मृत्यूनंतर अर्हीडास त्याच्या साम्राज्याचा सम्राट बनला होता. त्याला काही मानसिक विकार होते असे ऐतिहासिक नोंदीवरून संकेत मिळतात व तो राज्य सांभाळण्यास सक्षम नव्हता. त्यामुळे अलेक्झांडरच्या मृत्यूनंतर त्याच्या अनेक सरदारांनी बंड करून स्वतःचे राज्य बनवले व साम्राज्याचे विघटन झाले.