

वॉशिंग्टन : निसर्गाच्या साखळीत एखादा बदल झाला की, त्याचे परिणाम किती अनपेक्षित असू शकतात, याचे एक उत्तम उदाहरण अर्जेंटिनामधील ‘पॅटागोनिया’ भागात पाहायला मिळत आहे. येथील ‘माँटे लिओन नॅशनल पार्क’मध्ये प्युमा या हिंस्र मार्जार प्रजातीने चक्क पेंग्विनची शिकार करण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे, या अन्नामुळे नेहमी एकटे राहणारे हे प्युमा आता एकमेकांसोबत मिळून-मिसळून राहू लागले आहेत, असा निष्कर्ष एका नवीन संशोधनातून समोर आला आहे.
बुधवारी (17 डिसेंबर) ‘प्रोसिडिंग्ज ऑफ द रॉयल सोसायटी बी’ मध्ये प्रसिद्ध झालेल्या या शोधनिबंधातून ही अनोखी माहिती समोर आली आहे. 20 व्या शतकात मेंढीपालन करणार्या शेतकर्यांनी प्युमांना या भागातून हुसकावून लावले होते. 2004 मध्ये जेव्हा ‘माँटे लिओन नॅशनल पार्क’ची स्थापना झाली, तेव्हा प्युमा हळूहळू या भागात परतले. मात्र, त्यांच्या अनुपस्थितीत येथील परिसंस्था बदलली होती. समुद्रातील बेटांवर राहणारे ‘मॅगेलॅनिक पेंग्विन’ आता जमिनीवर वस्ती करून राहू लागले होते. तिथे पेंग्विनच्या सुमारे 40,000 जोड्यांची प्रजनन वसाहत तयार झाली होती. प्युमा परतल्यानंतर त्यांनी या बदललेल्या परिस्थितीचा फायदा घेण्यास सुरुवात केली.
शास्त्रज्ञांना सुरुवातीला वाटले की, एखादा-दुसरा प्युमा पेंग्विनची शिकार करत असेल. मात्र, संशोधनादरम्यान पेंग्विन वसाहतीजवळ मोठ्या संख्येने प्युमा वावरत असल्याचे दिसून आले. 2019 ते 2023 दरम्यान शास्त्रज्ञांनी 14 प्युमांना ‘जीपीएस कॉलर’ लावून त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवले. यापैकी 9 प्युमांनी नियमितपणे पेंग्विनची शिकार केली, तर 5 प्युमांनी शिकारीसाठी इतर प्राण्यांची निवड केली. नेहमी एकमेकांपासून दूर राहणारे प्युमा पेंग्विनच्या वसाहतीजवळ एकमेकांच्या अस्तित्वाचा स्वीकार करत असल्याचे आणि अधिक सामाजिक झाल्याचे दिसून आले.
न्यू जर्सी येथील ‘ड्यूक फार्म्स’मधील पर्यावरणशास्त्रज्ञ आणि अभ्यासाचे सह-लेखक मिचेल सेरोटा म्हणाले, ‘आजच्या बदललेल्या वातावरणात वन्यजीवांचे पुनर्वसन करणे म्हणजे केवळ जुनी परिसंस्था परत मिळवणे नव्हे. यामुळे प्राणी आणि त्यांच्या वर्तनामध्ये पूर्णपणे नवीन आणि अनपेक्षित बदल घडून येऊ शकतात.’ हा शोध दर्शवतो की, जेव्हा शिकारी प्राणी त्यांच्या जुन्या अधिवासात परततात, तेव्हा त्यांना मिळालेले नवीन खाद्य त्यांच्या सामाजिक रचनेत आणि वागणुकीतही बदल घडवून आणू शकते.